


फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी; सर्व फटाके शासनाने ठरवलेल्या मर्यादेत
नागपूर : मा. राष्ट्रीय हरित लवादाच्या १४ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्यात फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम राबवली. नागपूर शहरातील बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या फटाक्यांचे नमुने खरेदी करून त्यांची ध्वनी पातळी तपासणी दिनांक १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आली.
ही तपासणी समितीच्या उपस्थितीत अमरावती रोडवरील विस्फोटक विभागाच्या परिसरात घेण्यात आली. समितीत पोलीस प्रशासन, विस्फोटक विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (म.प्र.नि. मंडळ), सेवाभावी संस्था तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या तपासणी दरम्यान एकूण ५५ प्रकारच्या फटाक्यांची ध्वनी पातळी मोजण्यात आली. त्यापैकी बहुतेक फटाक्यांची ध्वनी पातळी शासनाने ठरवलेल्या मर्यादेत म्हणजेच ५० ते ९९ डीबी दरम्यान असल्याचे आढळले. केवळ एका ब्रँडच्या फटाक्याची ध्वनी पातळी ११२.२ डीबी एवढी नोंदवली गेली.
ही तपासणी विस्फोटक नियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी उपस्थित अधिकारी व मान्यवरांमध्ये श्री. दिनेश मिरे (वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक), श्री. मनोज कालबांडे (पोलीस निरीक्षक, कळमेश्वर), सौ. हेमा देशपांडे (प्रादेशिक अधिकारी, म.प्र.नि. मंडळ, नागपूर), सौ. धनश्री पाटील (उप-प्रादेशिक अधिकारी, नागपूर-१), श्री. सुशिलकुमार राठोड (उप-प्रादेशिक अधिकारी, नागपूर-२), सौ. शितल उधाडे (क्षेत्र अधिकारी), श्री. मनोज वाटाणे (क्षेत्र अधिकारी) आणि श्री. अमोल देशमुख (म.प्र.नि. मंडळ, नागपूर) यांचा समावेश होता.