

– डॉ माधवी ठाकरे यांनी सांगितले रोमांचक अनुभव
– नेत्री संमेलनाचे आज, 10 डिसेंबर रोजी उद्घाटन
(Nagpur)नागपूर, 9 डिसेंबर
‘चांद्रयान-2’ चे अपयश हा खूप मोठा धक्का होता. पण त्यातून सावरत ‘चांद्रयान-3’ची तयारी सुरू केली. सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यामुळे ही मोहीम यशस्वी होणार याची सर्वांनाच खात्री होती. चांद्रयान-3 या यशस्वी उड्डानानंतर 23 जुलैला त्याचे चंद्रावर यशस्वी लँडींग झाले आणि एकच जल्लोष झाला. ‘वंदेमातरम्’, ‘भारत माता की जय’चा आम्ही जयघोष केला. ता क्षण माझ्यासाठी ‘लाइफटाईम अचिव्हमेंट’चा ठरला, अशा भावना मूळ नागपूरच्या व सध्या अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे कार्यरत असलेल्या (Dr. Madhavi Thackeray)डॉ. माधवी ठाकरे यांनी व्यक्त केल्या. यावेळी नेत्री संमेलनाच्या समन्वयक अॅड. पद्मा चांदेकर व श्रुती गांधी यांची उपस्थिती होती.
महिला समन्वय आणि संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्यावतीने उद्या रविवार, 10 डिसेंबर रोजी रेशिमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित नेत्री संमेलनाच्या उद्घाटनासाठी डॉ. माधवी ठाकरे नागपुरात आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
डॉ. माधवी ठाकरे यांचा जन्म मूर्तिजापूर येथे झाला असून अकोला येथून बीएससी, अमरावती विद्यापीठातून एमएससी आणि पुणे विद्यापीठातून त्यांनी मटेरियल सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली आहे. त्याकाळी इस्रोच्या लोगोचे प्रचंड आकर्षण होते. 2009 साली जेव्हा इस्रोकडून सायंटिफीक इंजिनीयर म्हणून ऑफर लेटर आले त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झाला होता, असे त्या म्हणाल्या. ‘चांद्रयान-3’ ला चंद्रावर ठरलेल्या ठिकाणी लँडिंग करण्यासाठी यानाला जे रिमोट सेन्सींग चार कॅमेरे लावण्यात आले होते ते डॉ. माधवी ठाकरे यांच्या चमूने तयार केले होते, हे विशेष. 26 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्हा सर्व महिला वैज्ञानिकांना भेटायला आले तेव्हा आपल्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असल्याचे वाटले होते. तो क्षण आम्ही केलेले परीश्रम विसरायला लावणारा होता, असे डॉ. ठाकरे म्हणाल्या. या यशात पती व मुलीचा महत्वाचा वाटा असे सांगताना डॉ. ठाकरे म्हणाल्या, कुटुंबाचे पाठबळ असल्याशिवाय महिलांना यश मिळणे कठीण असते.