एक वादळी नेतृत्व : चंद्रशेखर बावनकुळे 

0
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा परिषदेची निवडणूक लढतो का? कधीकाळी नितीन गडकरी यांनी हा प्रश्न या तरुणाला विचारला होता. तेव्हा, काय असते जिल्हा परिषद, कशी लढायची असते निवडणूक, असे भाबडे प्रश्न त्या तरुणाने गडकरींना विचारले होते…. तत्पूर्वी या तरुणाच्या नेतृत्वात झालेले प्रकल्पग्रस्तांचे एक आंदोलन, रास्त्यावरची वाहतूक रोखून धरण्याची त्या आंदोलनाची ताकद, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या नजरेत भरली आणि चंद्रशेखर बावनकुळे नावाच्या एका वादळी नेतृत्वाच्या राजकीय प्रवासाची पायाभरणी झाली…

एक नेता. एक उद्यमशील नेतृत्व. भारतीय जनता पक्षासारख्या एका प्रचंड मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेऊन पक्षाच्या विजयासाठी सरसावलेले नेतृत्व. कामाचा प्रचंड आवाका. कामाचा प्रचंड झपाटा. समोरच्या व्यक्तीचे म्हणणे क्षणात समजून घेण्याची कुवत, कलेपासून-विज्ञानापर्यंत अशी ग्रास्पिंग पाॅवरची वाईड रेंज, आपण ज्यांचे प्रतिनिधित्व करतोय ती जनता आणि त्या परिसराच्या विकासासाठी झटण्याची जगावेगळी पद्धत, विकासाची दृष्टी, अशा एक नव्हे, तर अनेक वैशिष्ट्यांचा मेळ म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे नावाचं एक वादळी व्यक्तिमत्व. एका ऑटो चालकापासून तर जिल्हा परिषद सदस्यापर्यंत आणि आमदारापासून तर मंत्री -प्रदेशाध्यक्षापर्यंतच्या विविध भूमिका साकारणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कालखंडात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तयार आणि सिद्ध केले आहे. भाजपाने गतवेळी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली, त्यावेळी त्यांनी दाखवलेला संयम तर विलक्षण होता. बहुधा त्यामुळेच त्यांच्यावर पक्षनेतृत्वाने नंतरच्या काळात अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तेवढ्याच विश्वासाने टाकल्या. आणि बावनकुळे यांनी स्वतःच्या आगळ्या कार्य शैलीने तो विश्वास सार्थ ठरवला. विरोधी पक्षाच्या स्थानिक, राज्यस्तरीय नेत्यांपासून तर राहुल गांधींपर्यंत सर्वांशी थेट भिडत त्यांच्या आरोप-प्रत्यारोपांचा समाचार घेताना त्यांना बघितलं की, पक्षनेतृत्वाची निवड योग्य असल्याचे आपसूकच सिद्ध होऊन जाते.

सत्ता हाती नसतानाही कामठी मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून ज्या पद्धतीने विकासनिधी खेचून आणला, ते बघितल्यावर विधिमंडळातील सारेच थक्क व्हायचे. जिल्हा परिषद सदस्य असताना पासूनच या परिसराचा विकास करण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास, मंत्री झाल्यावर अधिकच रुंदावला. पालकमंत्री म्हणून त्यांनी डीपीडीसी निधीच्या रुंदावलेल्या कक्षा म्हणजे, आजवर कुणालाही न साधलेली किमया होती.

कामठी मतदारसंघातील रस्ते असोत, ड्रॅगन पॅलेस असो वा मग कोराडीचे महालक्ष्मी मंदिर, या परिसराचा चेहरामोहरा बदलण्यात त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. भविष्यातही शेगावच्या धर्तीवर कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्याचा त्यांचा संकल्प आहे. मल्टी ऑर्गन हाॅस्पिटल, अत्यल्प दरात भोजन व्यवस्था, स्थानिक विद्यार्थ्यांना नाममात्र दरात शिक्षण आदी बाबी, त्यांच्या या संकल्पाचा भाग आहेत.

आता, एक उमेदवार म्हणून त्यांना स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करायचा आहे. पण पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील सांभाळायची आहे. ही प्रचंड मोठी जबाबदारीही ते लीलया पार पाडत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केला त्या नंतरच्या पाच दिवसात त्यांनी सारा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. त्यानंतर त्यांनी इतर मतदारसंघातील प्रचारासाठी स्वतःला झोकून दिले आहे. कधी या जिल्ह्यात, तर कधी त्या जिल्ह्यात असा प्रवास सातत्याने सुरू आहे. एकामागून एक अशी सभा, बैठकी असा दिनक्रम सुरू आहे. प्रचार संपला की प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यभराचा आढावा घेणं सुरू होतं. या धबडग्यात, झोपायला रात्रीचे दोन वाजले तरी दुसरा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. शेवटी, पक्षाला यश मिळणे हेच साध्य आहे. आणि ते मिळवण्यासाठीच सारी मेहनत, धडपड चालली आहे. पण, प्रचाराच्या या धामधुमीत सुध्दा त्यांचा परंपरागत पद्धतीने चालत आलेला स्थानिक लोकांसाठीचा जनता दरबार अखंड चालू आहे. कोराडीतील त्यांच्या निवासस्थानी, दिवस उगवला की लोकांची ये-जा सुरू झालेली असते. निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीतही चंद्रशेखर बावनकुळे या लोकांना तास-दोन तास भेटतात. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातात. त्यातील सुटण्यासारख्या असतील त्या जागीच निकाली काढल्या जातात. काहींचा मार्ग खुला होतो….यात वैद्यकीय मदतीसाठी आलेल्यांची संख्या मोठी असते. पण जनता दरबारात आलेल्यांपैकी कोणीही निराश होऊन परत जात नाही. यातील काहींना पैशाची गरज असते, कुणाला चांगल्या डॉक्टरची ट्रीटमेंट मिळावी म्हणून मुंबई गाठायची असते, तर कुणाला मुंबईत पोहोचल्यावर पेशंटची राहण्याची सोय करून हवी असते… प्रत्येकाला जमेल तशी मदत होईल अशी व्यवस्था केली जाते. आजवर किती रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना मदत केली, याचा हिशेब त्यांनी कधी ठेवला नाही…लोकही मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे येतात. त्यांच्या साऱ्या आशा संपल्या की हक्काचं, विश्वासाचं एक स्थान उरते आणि ते स्थान असते, चंद्रशेखर बावनकुळे नावाच्या दिलदार व्यक्तीमत्वाचे… बहुधा त्यामुळेच की काय, पण कोराडीच्या महालक्ष्मी मातेसोबतच या मायबाप जनतेचेही आशीर्वाद या नेत्याला लाभले आहेत…

पक्षाच्या राजकीय विचारांच्या चौकटीबाहेर वेगवेगळ्या लोकांशी पक्ष विरहीत मैत्री जपण्याची अफलातून रीत, हे बावनकुळे यांचे आणखी एक वैशिष्ट्य. राज्याचे ऊर्जामंत्री असताना स्वपक्षातील लोकांसोबतच विरोधी पक्षाचे लोकही त्यांच्यावर खूश असायचे. विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले अभिनंदन असो, वा मग सुप्रिया सुळे यांनी केलेले कौतुक, ही बावनकुळे नामक व्यक्तीच्या यशाची साक्ष ठरते.

कधीकाळी त्यांच्या मातोश्री, इथल्या देवीच्या मंदिरासमोर भाविकांसाठी एक दुकान चालवायच्या, त्यांचे स्वतःचे काम एक ऑटोचालक म्हणून सुरू झाले, आय आय टी मध्ये बी टेक साठी मिळालेली ॲडमिशन परिस्थितीमुळे नाकारावी लागली आणि साध्या विज्ञान क्षेत्रातील पदवीचा मार्ग स्वीकारावा लागला, यातील कुठल्याच गोष्टीचा विसर पडू न देता, जमिनीवर घट्ट पाय रोवून उभे राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे आज पक्षाच्या विजयाची पताका आकाशात उंचावण्यासाठी कार्यप्रवण झालेले दिसताहेत…

 

  • सुनील कुहीकर | नागपूर