
विको कंपनीचे चेअरमन यशवंतराव केशवराव पेंढरकर (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, शनिवारी केशवायनमः, १६६२-अ, चिटणवीस मार्ग, सिव्हिल लाइन्स येथून सकाळी ९.३० वाजता निघेल. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात पत्नी शुभदा, मुले अजय आणि दीप, मुलगी दीप्ती, नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे.
यशवंतराव पेंढारकर यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते विको समुहात रूजू झालेत. त्यांच्या कायदेविषयक अभ्यासाचा विको समुहाला वेळोवेळी फायदा झाला. सेंट्रल एक्साइजविरुद्ध सुमारे ३० वर्षे चाललेला खटला त्यांच्यामुळे जिंकण्यात कंपनीला यश प्राप्त झाले होते. त्या खटल्यातील युक्तिवाद तसेच संपूर्ण कायदेविषयक निर्णय त्यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले होते. त्यांनी काही काळ कंपनीत संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. ते २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झालेत. त्यांच्या नेतृत्वात कंपनीने काळसुसंगत बदल स्वीकारत प्रगतीचे नवनवीन टप्पे गाठलेत. त्यांच्याच चेअरमनशिप अंतर्गत कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सचा ‘ब्रॅण्ड ऑफ द इअर २०२३’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय निर्यातीशी संबंधित बरेच पुरस्कार त्यांच्या कार्यकाळात कंपनीला मिळालेत. एक सौम्य, शालीन व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची औद्योगिक विश्वात ओळख होती. त्यांचा संस्कृत भाषेवर पगडा होता. त्यांना भगवद्गीता, रामायण आदी धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्या निधनाने सर्वांना सोबत घेऊन चालणारे सुसंस्कृत आणि समंजस व्यक्तिमत्त्व तसेच उद्योजक गमावल्याची भावना औद्योगिक विश्वाने व्यक्त केली.
०००
















