

मनपा कर्मचाऱ्याचा असाही पुढाकार ; चष्मेही वाटले
नागपूर:- शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञतेची भावना जपत नागपूर महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने वाढदिवस साजरा केला. मनपाच्या नेहरूनगर झोन कार्यालयामध्ये कार्यरत कर्मचारी अशोक संतोष मेश्राम यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्या आणि पुरूष कर्मचाऱ्यांना चष्मे वितरीत करून वाढदिवस साजरा केला.
त्यांच्या या अनोख्या पुढाकाराबद्दल मनपाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. अशोक मेश्राम यांचा ५ जून रोजी ६०वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त नेहरूनगर झोनमधील प्रभाग ३१ मधील यशवंतराव चव्हाण वाचनालय येथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येत सहभाग नोंदविला. कार्यक्रमात त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांना साड्या आणि चष्मे वाटप केले.
प्रभाग ३१मध्ये सुपरवायजर (supervisor) म्हणून कार्यरत असाताला आपल्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांनी सख्य जपणाऱ्या अशोक मेश्राम यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढाकाराचे कौतुक करण्यासाठी माजी नगरसेवकांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. माजी उपमहापौर श्री. सतीश होले, माजी नगरसेवक रवींद्र (छोटू) भोयर यांच्यासह दिनेश कलोडे, कमलेश खानविलकर, सुनिल काळे, अनील दौंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.