

नवमतदारांनी केला ‘केक पार्टी’त लोकशाहीचा जागर
शेफ विष्णू मनोहर यांनी तयार केला 15×5 फूट आकाराचा ‘महा केक’
नागपूर (Nagpur), 7 एप्रिल
देशाला अत्यंत कठीण परिस्थितीत स्वातंत्र्य मिळाले आहे. ही लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रत्येकाने देशासाठी मतदान केले पाहिजे, असे मत पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी व्यक्त केले.
नवमतदारांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्समध्ये ‘माझे पहिले मत देशासाठी’ असा नारा देत ‘केक’ कापून लोकशाहीचा जागर केला. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी पहिल्यांदा मतदान करणा-या युवावर्गासाठी 15 बाय 5 फूट आकाराचा केक तयार करून ‘केक पार्टी’चे आयोजन केले होते. एरवी वाढदिवसाला ‘केक’ कापून आनंदोत्सव साजरा केला जातो. पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने आपला मतदान हक्क बजावून लोकशाहीच्या या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, या उद्देशाने शेफ विष्णू मनोहर यांच्यावतीने रविवारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. आरुज केक्सच्या अदिती देशपांडे आणि त्यांची चमू मेघा दरबेश्वर, प्रवज्ञा वाडे यांचे विष्णू मनोहर यांना सहकार्य लाभले.
नवमतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी व नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून शेफ विष्णू मनोहर यांना ‘एसव्हीप आयकॉन (SVEEP ICON)’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल व नवमतदारांच्या हस्ते केक कापून या ‘केक पार्टी’चे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. रविंद्र सिंगल म्हणाले, विष्णू मनोहर यांनी राबवलेला हा ‘केक पाटी’ चा उपक्रम प्रशंसनीय आहे. मागील निवडणुकीत 54 टक्के मतदान झाले होते. त्यात वाढ व्हावी या उद्देशाने यावेळी विविध उपक्रम राबवले जात असून त्याच शृंखलेतील हा उपक्रम आहे. मतदान केले की तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार मिळतो. तेव्हा अवश्य मतदान करा, असा सल्लाही डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिला.
विष्णू मनोहर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती दिली व नवमतदारांनी या संधीचा मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी लाभ करून घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जत्थे यांनी केले. या उपक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर व नागपूर जिल्हा निवडणूक कार्यालयाचे सहकार्य लाभले.