दगडफेक प्रकरणी १०० जनांविरुद्ध गुन्हा

0

 

नांदुरा मिरवणुकीवरील दगडफेक प्रकरणी १०० जनांविरुद्ध गुन्हा

बुलढाणा (Buldhana )- छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी २८ मार्च रोजी तिथीप्रमाणे जयंती होती. यानिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नांदुरा शहरात सकाळी मोटारसायकल रॅली व सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी अंबादेवी गड देवगड येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक मोतीपुरा भागातून जात असताना अचानक काही अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या दगडफेकीत मोतीपुरा येथील राज संतोष सोनोने हा तरुण जखमी झाला. यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही दगडांचा मार बसला. ठाणेदार विलास पाटील यांनी आयोजकांची समजूत घालून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. मात्र आठवडी बाजाराकडून येणाऱ्या रस्त्याकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. यानंतर दुसऱ्या गटानेही दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वत्र पळापळ सुरू झाली. घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परीस्थिती आटोक्यात आणली. या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकून १०० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून आतापर्यंत एकूण १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.