विदर्भ साहित्य संघाच्या वाङ्मय पुरस्कारांसाठी साहित्‍य पाठविण्‍याचे आवाहन

0

नागपूर(Nagpur) ३ जुलै :- ख्यातनाम वैदर्भीय लेखकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ वैदर्भीय लेखकांना दरवर्षी विदर्भ साहित्य संघातर्फे वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्‍कारांमध्‍ये, कादंबरी लेखनासाठी पु. य. देशपांडे स्मृती पुरस्‍कार, वैचारिक वाङ्मयासाठी म. म. वा.वि.मिराशी स्मृती पुरस्‍कार, आत्मचरित्रासाठी अण्णासाहेब खापर्डे स्मृती पुरस्‍कार, समिक्षा लेखनासाठी कुसुमानिल स्मृती पुरस्‍कार, कविता लेखनासाठी शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती पुरस्‍कार, शास्त्रीय लेखनासाठी य. खु. देशपांडे स्मृती पुरस्‍कार, प्रवासवर्णनासाठी संत गाडगेबाबा स्मृती पुरस्‍कार, चरित्रलेखनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती पुरस्‍कार, कथालेखनासाठी वा. कृ. चोरघडे स्मृती पुरस्‍कार, साहित्यशास्त्र किंवा संतसाहित्य विषयक लेखनासाठी डॉ. मा. गो. देशमुख स्मृती पुरस्‍कार, नाट्यलेखनााठी नाना जोग स्मृती पुरस्‍कार, बालसाहित्यासाठी बा. रा. मोडक स्मृती, संकीर्ण लेखनासाठी वा. ना. देशपांडे स्‍मृती पुरस्‍कारांचा समावेश आहे. साहित्‍य‍िकांकडून प्राप्‍त झालेल्‍या पुस्तकांतील उल्लेखनीय पुस्तकांना हे पुरस्कार दिले जातात. त्याशिवाय, दोन नवोदित लेखकांनादेखील त्यांच्या पहिल्या पुस्तकांसाठी पुरस्कृत केले जाते.

विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्दी वर्षापासून डॉ. श्रीधर शनवारे, डॉ. आशा सावदेकर आणि तात्यासाहेब देशपांडे सोनाटकर यांच्या स्‍मृतिप्रीत्‍यर्थ राज्य पातळीवरील लेखकांच्या कलाकृतींना पुरस्कृत करण्यात येते. या पुरस्कारांसाठी वाङ्मयप्रकाराचे बंधन नाही. उपलब्ध पुस्तकांतूनच हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी विदर्भासह महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्रातील लेखकांच्या पुस्तकांचादेखील विचार करण्‍यात येतो.

लेखक किंवा प्रकाशकांनी १ ऑगस्ट २०२३ ते ३१ जुलै २०२४ या दरम्यान प्रकाशित झालेली पुस्‍तके या पुरस्कारांसाठी पाठवायची आहेत. त्‍याकरीता लेखक किंवा प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रती, पासपोर्ट आकाराचा एक छायाचित्र तसेच, लेखक/कवींचा परिचय पाठवावा. लेखकांनी किंवा प्रकाशकांनी दि. ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ, झाशी राणी चौक, सीताबर्डी, नागपूर -४४००१२ या पत्त्यावर पुस्‍तके पाठवावी किंवा कार्यालयीन वेळात प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यावीत.

पुरस्‍कारांचे स्‍वरूप रोख ५००० (पाच हजार रुपये) आणि स्मृतिचिन्ह असे असून विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात दि.१४ जानेवारी २०२५ रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, असे विलास मानेकर,
सरचिटणीस, विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांनी कळवले आहे.