

नागपुरात 15 डिसेंबरला शपथविधीची शक्यता
नागपूर (Nagpur) : नागपुरातील राजभवनात मंत्रिमंडळाच्या शपथविधीची तयारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सहकार्याने सरकार स्थापन झाले, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही प्रलंबित आहे.
16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आज 14 डिसेंबरपर्यंत मुंबईत कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. दरम्यान, तिन्ही पक्षांमध्ये कोटा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले जात असून आता या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांना संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असून शपथविधीसाठी आवश्यक तयारी सुरू असल्याचेही वृत्त आहे.