

रत्नागिरी(Ratnagiri) १८ जून :- मिऱ्या येथे मासे गरवण्यासाठी गेलेला पानवल येथील राहूल शाम घवाळी (२४, रा. पानवल, रत्नागिरी) हा तरुण समुद्राच्या पाण्यात पडून वाहून गेल्याची घटना घडली. त्याचा मृतदेह रात्री उशिरा त्याच ठिकाणी मिळाला आहे.
सोमवारी दुपारी पानवल आणि चरवेली येथील राहुल राजेंद्र शिंदे (२४), दिगंबर अनंत गराटे (२०) (दोघे रा. चरवेली, रत्नागिरी) व राहूल घवाळी (२४, रा. पानवल, रत्नागिरी) हे तीन तरुण दुपारी मिऱ्याबंदर येथील भारती शिपयार्ड कंपनीच्या पाठीमागील भागात मासे गरविण्यासाठी गेले होते. तेव्हा राहूल घवाळी अचानक आलेल्या लाटेत फसला तो पाण्यात ओढला जाऊ लागला. त्यावेळी राहुल शिंदेने त्याला वाचवण्याचा अथक प्रयत्न केला. पाण्याच्या लाटेत वाहत जाणाऱ्या राहूल घवाळीने राहुल शिंदेने पाण्यात टाकलेली मासे गरविण्याची स्टिकही पकडली होती; पण पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की तो वाहून गेला.
राहुलच्या सोबत असलेल्या या दोन मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर मिऱ्या येथील काही ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी राहुलच्या सोबत असलेल्या मित्रांनी घटनेची खबर शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले, त्याचा शोध घेतला असता रात्री त्याच ठिकाणी राहुलचा मृतदेह सापडला.दरम्यान, या घटनेचा धक्का बसल्याने राहूलचा घवाळीचा मित्र राहुल शिंदे बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत.