१३ डिसेंबरपर्यंत मंत्रिपद पक्के होते मग, काय नेमकं घडलं?

0

नागपूर (Nagpur) : १३ डिसेंबरपर्यंत मंत्रिपद पक्के होते, १५ ला नाव कटले भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट नागपूर : ‘मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे, हे मला सांगण्यात आले. १३ डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत होते. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले. पण, १५ डिसेंबर रोजी काय झाले याची मला कल्पना नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांचा गौप्यस्फोट

कोणत्या पेनची शाई होती, हे मला माहीत नाही,’ असा गौप्यस्फोट बुधवारी भाजपचे ज्येष्ठ नेते तसेच माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीमध्ये नाराजीचा स्फोट झाला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील मंत्रिपद पक्के असताना नाव कसे कटले, अशी भावना यापूर्वी व्यक्त केली. त्यानंतर बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले,‘मंत्रिपद न मिळाल्यामुळे मी नाराज नाही. २३७ आमदारांपैकी ४२ आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधानपरिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील १९६ आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही.

त्यातलाच मी एक आहे. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. आता माझ्याकडे पद नाही, असे म्हणता येणार नाही. मी आमदार आहे. त्यातूनही मी जनतेची कामे करू शकतो. आजवर माझ्या मतदारसंघात जेवढी काम मी केलीत त्याचे कौतुक देश करतोय. ‘वक्त आयेगा, वक्त जायेगा’, पण आपले काम करत राहिले पाहीजे. आपल्या एखाद्या कृतीतून पक्षाचे नुकसान होता कामा नये. या पक्षासाठी हजारो लोकांनी त्याग केला आहे. अशा पक्षाला नुकसान होईल, अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी करू नये. मी पक्षाचे काम करत राहणार आहे.’ ०००