

बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी कोलकाता येथे दाखल
bsf-red-alert-on-bangladesh-border कोलकाता (Kolkata), 05 ऑगस्ट : बांगलादेशातील (Bangladesh)हिंसाचारानंतर पंतप्रधान शेख हसीना पायउतार होऊन परांगदा झाल्यानंतर सैन्याने तेथील सत्ता ताब्यात घेतली आहे. त्यानंतर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. सोबतच बीएसएफचे डीजीही पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे पोहोचले आहेत.
बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्था लष्कराच्या हातात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमा 4 हजार 96 किलोमीटर लांबीची आहे. बीएसएफने सर्व सीमेवर अलर्ट जारी केला आहे. बांगलादेशात गेल्या महिनाभराहून अधिक काळ निदर्शने सुरू आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसक निदर्शनांनंतर राजीनामा दिल्यानंतर राजधानी ढाका येथून आपल्या बहिणीसह सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. सुमारे 300 लोकांचा मृत्यू झालेल्या आरक्षणाच्या निषेधार्थ आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
जीवाला धोका टाळण्यासाठी शेख हसिना या त्यांच्या बहिणीसाठी हेलिकॉप्टरने त्रिपुराच्या आगरतळा येथे पोहोचल्या आहेत. शेख हसिना यांना व्हिडीओतून देशातील नागरिकांना संदेश द्यायचा होता. मात्र लाखो आंदोलक शेख हसिना यांच्या अधिकृत निवासस्थानाकडे निघाल्यामुळे त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी तात्काळ देश सोडला. बांगलादेशमध्ये आंदोलकांनी टांगेल आणि ढाका येथील महत्त्वाचे महामार्ग ताब्यात घेतले आहेत.
हसीना यांच्या सरकारच्या विरोधात सुमारे 4 लाख बांगलादेशी लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी 2.30 वाजता लष्करी हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले. दरम्यान बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू लोकांची हत्या होत असल्याचा दाव पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते शिवेदू अधिकारी यांनी केलाय. तसेच बांगलादेशात माजलेल्या अराजकाच्या पार्श्वभूमीवर तेथील हिंदू भारतात शरण घेण्याची शक्यता असल्याचे शिवेंदू अधिकारी यांनी म्हंटले आहे.