प्रलंबित मागण्यांसाठी बोर्डाच्या परीक्षांवर बहिष्कार

0

-महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर- अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी 10 वी, 12 वीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळाच्या पुणे येथे 17 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देण्यात आले आहे.
यात प्रलंबित मागण्यांमध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा रिक्त जागा असून 2012 पासून भरती प्रक्रिया झाली नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने शाळांची आर्थिक परिस्थिती खालावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रश्नांवर त्वरित बैठक घेऊन ते सोडवावे, अन्यथा राज्यातील 10 वी, 12 वीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असल्याचे माजी मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील व कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना कळविले आहे.