गावात तब्बल 30 शेतकरी आत्महत्या; आता गावाचे चित्रच बदलले

0

यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील बोथबोडन गावात 2003 ते 2021 या 18 वर्षात तब्बल 30 शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. यामुळे या गावाला आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जात होते. परंतु, गावात सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने जमिनी सिंचनाखाली आल्या आणि आता गावात शेतकरी आत्महत्या कमी झाल्या आहेत. गावात सिंचनामुळे आर्थिक समृद्धी आली आहे. (Bothbodan Village – Yavatmal)

बोथबोडन येथे 26 जानेवारी 2003 मध्ये पहिली शेतकरी आत्महत्या झाली. त्यानंतर 2021 पर्यंत आत्महत्याचे सत्र सुरूच राहिले. 18 वर्षात 30 शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. मात्र, गावातील चित्र आता बदलले आहे. शेती सिंचनाखाली आली. शेतकरी बारमाही पीक घेत असून, दुग्ध उत्पन्न मोठ्या प्रमाणात होत आहे. गावातील युवक कोणते ना कोणते काम करून कुटुंबाला हातभार लावत आहे. 2005 मध्ये शंकर सूर्यभान वाघमारे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यांच्या पत्नीने कुटुंबाला सावरले. स्वतः शेती करून मुलांना शिकवले. मुलगा सतीश एसटीत चालक म्हणून नोकरीला लागला आहे आणि मुलगी अंगणवाडी सेविका आहे. (Many Farmer Suicide in Bothbodan village of Yavatmal | Exclusive लेटेस्ट न्यूज)

गावातील सिताराम भुराजी दुमारे या अल्पभूधारक शेतकऱ्याने 2012 मध्ये आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा नागोराव दुमारे यांनी रोज मजुरी करून कुटुंबाला सावरले. नागोराव यांचा मुलगा सतीश याने वडिलांना हातभार लावण्यासाठी शेतात मजुरीचे काम केले. जिद्दीतून बीएसस्सीपर्यंत शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्याच्या कठोर मेहनतीला फळ येत एकाच वेळी तलाठी व वनरक्षकपदाच्या परीक्षा पास झाला. एक महिन्यापूर्वीच सतीश तलाठी म्हणून घाटंजी येथे रुजू झाला आहे. याशिवाय गावात लघू आणि पाझर तलाव आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आली. शेतीसोबतच शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला आहे. गावात 200 पेक्षा जास्त म्हैसी आहेत. यातून एक हजार लिटर दुग्ध उत्पन्न होत आहे. शेती सिंचनाखाली येत गेल्याने आता गावातील चित्र बदलत आहे.