

‘महा स्काय महाराष्ट्र सौर कौशल्य योजना’ कार्यशाळेचे मौजा चंकापूर येथे उद्घाटन;
महिला विद्यार्थिनींना प्रोत्साहन

नागपूर , दि. १० नोव्हेंबर २०२५, सोमवार रोजी सावनेर विभागांतर्गत मौजा चंकापूर येथे ‘महा स्काय महाराष्ट्र सौर कौशल्य योजना’ या महत्त्वाकांक्षी ६ दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. महावितरण,एशियन डेव्हलपमेंट बँक आणि स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी, महावितरणचे मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे श्री मुखर्जी , आणि स्किल कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्सचे श्री. सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील, विशेषतः महिला विद्यार्थिनींना सौर ऊर्जा क्षेत्रात कौशल्य प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून आलेल्या उत्साही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या वेळी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी कार्यशाळेला भेट देऊन पाहणी केली. मुख्य अभियंता श्री. दिलीप दोडके आणि इतर मान्यवरांनी उपस्थित आयटीआय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सौर ऊर्जा क्षेत्रातील रोजगार संधी आणि स्वयंरोजगाराचे महत्त्व समजावून सांगितले. ग्रीन जॉब्सच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांचे *भविष्यकालीन महत्त्व* त्यांनी अधोरेखित केले.
‘महा स्काय महाराष्ट्र सौर कौशल्य योजना’ ग्रामीण युवकांना ऊर्जा क्षेत्रातील *नवीन तंत्रज्ञान* आत्मसात करण्यास आणि *आत्मनिर्भर* होण्यास मदत करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

















