‘या’ कारणामुळे भाजपचा पराभव

0

निवडणुकीत हे ४ मुद्दे ठरले प्रभावी

नागपूर (Nagpur) 06 जून :- लोकसभा निवडणुकीत भाजपचे नुकसान झालेल्या राज्यांमध्ये उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी एनडीएला 17 जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी 2019 च्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुनील कुहीकर(Sunil Kuhikar) यांनी यासाठी हे 4 मुद्दे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे – ‘एफएमपीओआर’ म्हणजे फॉरमर (शेतकरी), मराठा आंदोलन, ओबीसी फॅक्टर आणि रूमर(OBC Factor and Rumor).

देशात पहिल्यांदाच 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. त्यावेळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्र सत्तेच्या इमारतीत एका खांबासारखा भाजपच्या बाजुने उभा ठाकल्याचे दिसले. तत्कालीन अविभाजित शिवसेना आणि भाजप युतीने राज्यात 48 जागा जिंकल्या होत्या. युतीने तब्बल 43 जागा मिळवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची गाळण उडवली होती. पण मंगळवारी, 4 जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची कामगिरी अपेक्षाभंग करणारी ठरली. यावेळी भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला (अजित पवार)Ajit PAwar एक जागा मिळाली. ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर म्हणाले की, राज्यातील शेतकरी, मराठा आंदोलन, ओबीसी फॅक्टर आणि अफवांमुळे भाजप आणि मित्रपक्षांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मराठा आरक्षणाचे आंदोलन. कारण राज्य सरकारने ज्या पद्धतीने आंदोलन हाताळले त्यामुळे महायुतीने मराठवाड्यातील 8 जागा गमावल्या. आंदोलनाच्या दबावाखाली मराठा समाजाचा 10 टक्के कोटा मिळवला, पण तो कोर्टात अडकला. एक वेळ अशी आली की मराठा आरक्षणावरून राज्यातील ओबीसी(OBC) संतप्त झाल्याचे दिसून आले. ओबीसी समाज ही भाजपची भक्कम व्होट बँक आहे(OBC community is a strong vote bank of BJP), त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्याचे राजकीय परिणाम झाले. त्यामुळे मराठा आणि ओबीसी दोघेही भाजपवर नाराज झाले. त्याचा निवडणुकीवर लक्षणीय परिणाम झाल्याचे कुहीकर यांनी सांगितले. राज्यातील मोठी लोकसंख्या शेतीशी निगडित आहे. पश्चिम महाराष्ट्रात उसाचा पट्टा आहे, उत्तर महाराष्ट्रात कांदा आहे, विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन आणि कापूससाठी ओळखला जातो. शेतकऱ्यांचा संताप सर्वच भागात स्पष्टपणे दिसून आला. एकीकडे हवामान बदलामुळे शेतकरी चिंतीत होता. तर दुसरीकडे कृषी धोरणांमुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी मतपेटीतून नाराजी व्यक्त केली.

निवडणुकीदरम्यान विरोधी पक्षांनी पसरवलेल्या अफवांवर कुहीकर म्हणाले की, राज्यात दलित लोकसंख्या सुमारे 11 टक्के आहे. भाजपला संविधान बदलायचे आहे आणि यांना पुन्हा सत्ता मिळाली तर हे आरक्षण हिरावून घेणार आहे, असे आरोप प्रचारादरम्यान झाले. या अफवांमुळे पक्षाला मोठा फटका सहन करावा लागला. राज्याच्या राजकारणावर प्रकाश टाकताना ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन गटात विभाजन झाल्याने आणि भाजपच्या विचारसरणीपेक्षा वेगळे असलेले अजित पवार भाजपसोबत बसल्याने भाजपचे समर्थक नाराज झालेत. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागातील लोक मनाने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अगदी जवळचे आहेत. भाजपचे मोठे नेते विदर्भातून येतात. त्यामुळे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात शिवसेना-राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट आणि त्यांची दोन गटात विभागणी होणे तिथल्या लोकांना पसंत पडलेले नाही. ईडी आणि सीबीआयच्या छाप्यांमुळेही राजकीय समर्थक प्रचंड संतापलेले दिसत होते. किंबहुना या सर्व कारणांमुळे यावेळच्या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांची चांगलीच दमछाक झाली आहे. कुहीकर म्हणाले की, भाजपने उमेदवार निवडण्यात चूक केली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीत निदर्शनास आलेल्या राजकीय त्रुटींचे वेळी निराकरण न झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीएला (NDA) आणखी परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा कुहीकर यांनी दिला.