२०२४ नंतर भाजपाचे ‘स्वायत्त’ सरकार!

0

यापुढे भाजपाच्या संघटनमंत्रिपदी संघ प्रचारक नसणार

 

लोकसभा निवडणूक ऐन भरात असताना, इंडिया आघाडीचे तमाम नेते भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जंग जंग पछाडत असताना, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा(J. P. Nadda) एका मुलाखतीत एक विधान करतात. “भाजपा स्वतःच्या भरवशावर काम करण्यास सक्षम असल्याने त्याला आता संघाची गरज नाही,” असे त्यांचे ते वक्तव्य प्रचंड गाजले. त्यावरून उठायचे ते वादळ उठले. पण, ऐन निवडणुकीच्या मोसमात, निवडणूक निकालांचा मुहूर्त केवळ पंधरा दिवसांवर येऊन ठेपला असताना, भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी असे विधान करून वाद निर्माण करावा याचे संघ वर्तुळात आणि बाहेरही पडसाद उमटलेत. नड्डांनी असे बोलणे योग्य होते का, इथपासून तर त्यांनी हे बोलण्यासाठी ही वेळ योग्य होती का, इथपर्यंत वेगळाली मतं यावर व्यक्त होऊ लागली होती. पण, राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांच्या मते, ना नड्डांचे विधान चूक आहे, ना ते विधान करण्यासाठी त्यांनी साधलेला मुहूर्त!

मुळात भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या बोलण्यात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आपसी संबंधांबाबतचे नजिकच्या भविष्यातील स्वरुपाचे संकेत दडले आहेत. यासाठी संदर्भ दिला जातो, तो गेल्या ११ मे रोजी दिल्लीत पार पडलेल्या एका उच्चस्तरीय बैठकीचा. संघ आणि भाजपाच्या, बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या शीर्षस्थ नेत्यांच्या उपस्थितीत पुढील मार्गक्रमणाचा जो समजुतदारीचा मार्ग या दोन्ही संघटनांच्या नेतृत्वाने स्वीकारला आहे, संभाव्य मतभेद टाळण्यासाठी म्हणून ज्या मुद्द्यांवरची आपसी सहमती या बैठकीत निश्चित झाली, त्याचेच संकेत जे. पी. नड्डा यांच्या विधानातून झळकलेले दिसतात. अन्यथा, ज्यावरून वाद, गैरसमज निर्माण होऊ शकतात असे विधान करण्याइतका राजकीय संमजसपणाचा अभाव, ही काही नड्डांची ख्याती नाही! ऐन निवडणुकीच्या तोंडावर असली वादग्रस्त विधाने करून विरोधकांच्या हाती कोलीत देण्याइतके ते खुळे देखील नाहीत.

राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांच्या मते, या बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या मुद्द्यांवर पुढील काळात अंमल कसा होतो, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. पण, संघ आणि भाजपाच्या आपसातील संबंधांचे अधिक प्रगल्भ स्वरूप २०२४चे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर दिसेल. या दोन संघटनांच्या आपसातील संबंधांवर कुठलाही विपरीत परिणाम होऊ न देता, भाजपा पूर्ण स्वातंत्र्याने सरकार चालवेल आणि संघाच्या नेतृत्वात संघ परिवाराचा वेगवान विकास घडून येण्यासाठी सारी शक्ती पणाला लागेल… सोप्या भाषेत, भाजपाच्या कामात संघाचा कुठलाही हस्तक्षेप यापुढे असणार नाही, हा या बैठकीत निश्चित झालेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सांगितले जाते.

भाजपानेते राजकीय क्षेत्रातील गरजांच्या पार्श्वभूमीवर काम करतील. दरवेळी संघ परिवारातील नेतृत्वाचे मत विचारात घेण्याची निकड त्यांच्यासाठी यापुढे असणार नाही. इतकेच काय पण, भाजपाच्या संघटन रचनेत संघटनमंत्री पदासाठी संघाकडून दिले जाणारे प्रचारक देखील यापुढे दिले जाणार नाहीत. राष्ट्रीय संघटनमंत्री श्री रामलाल यांना संघाने परत बोलावून घेणे हे या निर्णयाच्या अंमलबजावणीतील पहिले पाऊल आहे. भविष्यात विविध राज्यांतील संघटनमंत्री पदावरील संघ प्रचारक क्रमाक्रमाने परत बोलावले जातील. ही प्रक्रिया देखील ११ मे रोजी दिल्लीत पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीतील चर्चेचा एक महत्त्वपूर्ण परिणाम असेल.

एकूण, राजकीय क्षेत्रात कार्यरत भाजपाला त्या क्षेत्रातील गरजेनुसार आवश्यक पावलं, पूर्ण स्वातंत्र्याने, स्वायत्तपणे उचलू देणे आणि सामाजिक संघटन असलेल्या संघ परिवाराने सामाजिक गरजा लक्षात घेऊन कार्यक्रम, उपक्रमांचे नियोजन करून वेगवान गतीने कार्य करणे आणि तेवढ्याच वेगाने संस्थात्मक विकास घडवून आणण्यावर भर देणे, ही यापुढे दोन बलाढ्य संघटनांची कार्य शैली असेल. ४ जून ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच्या पाच वर्षांतील, भाजपा आणि संघ परिवाराच्या मार्गक्रमणाची दिशा स्पष्ट करणारे हे निर्णय मानले जात आहेत. अनेकांच्या भुवया उंचावणारी, कित्येकांना पचनी न‌ पडणारी अशी ही भूमिका असली तरी जागतिक पातळीवर जी उंची गाठण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून येत्या काळात भाजपा व संघाला काम करायचे आहे, त्या ध्येयपूर्तीसाठीची ही पावलं आहेत.

याचा अर्थ, यापुढे भाजपा-संघाचे आपसात संबंधच असणार नाहीत, असा मात्र अजिबात नाही. संघ परिवारातील एक सदस्य संघटन म्हणून त्या संबंधांवर कुठलाच परिणाम होऊ न देता सरकार सरकारच्या पद्धतीने चालवता यावे यासाठी स्वीकारण्यात आलेली ही भूमिका आहे. घरात कौटुंबिक, औद्योगिक अथवा व्यावसायिक कारभार सांभाळण्यासाठी वडिलांनी आपल्या सक्षम मुलाला अधिकार बहाल करणे, पूर्ण स्वातंत्र्य देणे…एवढे साधे, सोपे असे त्याचे स्पष्टीकरण आहे…. एकूण, २०२४ नंतर देशात भाजपाचे ‘स्वायत्त’ सरकार कारभार बघणार आहे, हा त्याचा दुसरा अर्थ….

 

सुनील कुहीकर
नागपूर