

राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक
भारतीय जनता पार्टीचा (BJP) पुढील राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल याबद्दलची उत्सुकता अद्यापही कायम आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर राष्ट्रीय अध्यक्ष निवडणीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी भाजपा उत्सुक आहे. असं असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर झालेल्या बैठकीमध्ये भाजपचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष महिला किंवा ओबीसी असावा यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. एखाद्या महिलेकडे भाजपाचे अध्यक्षपद सोपवलं जावं अशा अनुषंगाने चर्चा झाली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी भाजपा आणि आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांची 5 तास बैठक झाली.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (National President Jagat Prakash Nadda) यांचा कार्यकाळ संपला आहे. पण अद्याप नवीन अध्यक्षाच्या नावावर मोहर उमटली नाही. या मुद्यावर भाजपची नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. लोकसभेतील नाराजी पाहता, भाजपने अध्यक्ष पदासाठी नवीन खेळी खेळल्याची चर्चा आहे. पक्षाची कमान ओबीसी अथवा महिलेच्या हाती देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थात अधिकृतपणे कोणतीची माहिती अद्याप समोर आलेली नाही.