

शिर्डीत महाअधिवेशनाची जय्यत तयारी
नवी दिल्ली (New Delhi) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला गृहमंत्र्यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले, ही पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी केली आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी सरकार, प्रशासन, आणि जनतेतील समन्वय वृद्धिंगत करून महाराष्ट्राला लोककल्याणकारी राज्य बनवण्याचे निर्देश दिले. राज्यातील भाजपच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी आगामी १२ जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपच्या महाअधिवेशनाची माहिती घेतली.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमित शहा यांना कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे काष्ठशिल्प भेट दिले आणि मातेच्या दर्शनासाठी निमंत्रण दिले. गृहमंत्र्यांनी हे निमंत्रण आनंदाने स्वीकारत लवकरच दर्शनाला येण्याचे आश्वासन दिले.
भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून १२ जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या महाअधिवेशनातून प्रचाराचा शंखनाद होणार आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य नेते उपस्थित राहणार आहेत.
भाजपच्या या महाअधिवेशनातून पक्षाची आगामी रणनीती ठरवली जाईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.