

चार जून नंतर, हे घडून येईल…!
भाजपाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलणार
देशात अठरावी लोकसभा स्थापन करण्याच्या प्रक्रियेतील मतमोजणीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा मंगळवारी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक अंदाज बांधले जाताहेत. पण तरीही चार तारखेच्या निकालानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात काही गोष्टी नक्कीच घडून येतील असे मानले जात आहे.
आधी दावा केला गेला त्या प्रमाणे चार सौ पारचा टप्पा गाठता येईल याबाबत शंका असली तरी देशात भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होईल याबाबत परिस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट झाली आहे.
* मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपात राष्ट्रीय अध्यक्षांसह काही संघटनात्मक बदल घडून येतील असे मानले जाते.
* भाजपाच्या संघटनमंत्रिपदी यापुढे संघाचे प्रचारक असणार नाहीत. सध्या जेवढे संघटनमंत्री कार्यरत आहेत, त्यांना संघरचनेत परत बोलावले जाईल.
* नरेंद्र मोदींच्या सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थेत यापुढे अधिक तंत्रज्ञ, एसटी, एससी, ओबीसी समुहातील लोक, महिलांना संधी दिली जाईल.
* भाजपा पक्ष संघटनेबाहेरील सक्षम लोकांना विविध क्षेत्रात काम करण्यासाठी पाचारण केले जाईल
* भाजपातील अनेक नेत्यांना सरकारी पदाविना पक्षसंघटना बळकट करण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. हा एक प्रकारे त्या नेत्यांसाठीची परीक्षेची घडी असेल. त्यांच्या पक्षनिष्ठेचा कस यानिमित्ताने लागणार आहे.
* एकूण काय, तर २०२९च्या निवडणुकीची तयारी चार जून नंतर सुरू झालेली असेल….
* दरम्यान, महाराष्ट्रातील यंदाचे भाजपाच्या दृष्टीने धक्कादायक निकाल लक्षात घेता, पुढील विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी या राज्यात नेतृत्व बदल घडून येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक जिंकणे अवघड असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेत हा बदल घडवून आणला जाईल. या निवडणुकीत भाजपाला केवळ अठरा जागा मिळण्याची शक्यता विविध संस्थांच्या एक्झिट पोल मधून व्यक्त झाला असून, ताकद नसताना एकनाथ शिंदे यांच्या गटाला लढण्यासाठी दिल्या गेल्याचे आता उघडपणे बोलले जात आहे.