
नवी दिल्ली : देशातील चुरशीच्या निवडणुकीत भाजपची पुन्हा सरशी झाली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोरम या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या.रविवारी झालेल्या मतमोजणीत राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात भाजप तर तेलंगणात काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
मध्यप्रदेश विधानसभेच्या 230 जागांपैकी भाजपने सुमारे 168 जागांवर आघाडी घेतली तर काँग्रेस 61 जगांवर पुढे आहे. शिवराजसिंह चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. छत्तीसगडमध्ये एक्झिट पोलचे अंदाज मागे टाकत भाजपने आघाडी घेतली आहे. छत्तीसगड विधानसभेच्या 90 जागांपैकी भाजपला 55 आणि काँग्रेसला 35 जागा मिळत असल्याचे चित्र आहे. राजस्थान विधानसभेच्या 199 जागांपैकी भाजपला 115, काँग्रेसला 69 जागा मिळतील असे चित्र आहे. तीन राज्यांमध्ये भाजपचा झेंडा फडकत असतानाच दक्षिणेचे प्रवेशद्वार असलेल्या तेलंगणात केसीआर यांना धक्का देत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. तेलंगणा विधानसभेच्या 119 जागांपैकी काँग्रेस 63 जागांवर आघाडी घेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्ताधारी भारत राज्य समिती (बीआरएस) 40 जागांवर आघाडी घेत दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेला आहे. भाजपने या महाविजयाचा आज देशभर जल्लोष साजरा केला.