मध्यप्रदेशात भाजपला निर्णायक आघाडी

0

 

भोपाळ, 03 डिसेंबर  : मध्य प्रदेश विधानसभेच्या 230 जागांसाठी आज, रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. यात दुपारी 1 वाजेपर्यंत भाजपने 150 हून अधिक जागांवर आघाडी घेतल्याचे दिसून आले. तर काँग्रेस 65 जागांवर पुढे दिसून आली. राज्यात भाजपने निर्णायक आघाडी घेतली असून त्यांच्या सत्तारोहणाची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय.

मध्यप्रदेशच्या शाजापूर जिल्ह्यातील कालापिपल येथून पहिला निकाल धक्कादायक आला. येथे भाजपचे उमेदवार घनश्याम चंद्रवंशी यांनी काँग्रेसचे तगडे उमेदवार आमदार कुणाल चौधरी यांचा 11,941 मतांनी पराभव केला. तर मुरैना येथील दिमानी येथील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मतमोजणीची आठवी फेरी पूर्ण झाल्यानंतर मागे पडले आहेत. बसपाने येथून आघाडी घेतली आहे. मतमोजणीच्या प्रारंभिक अंदाजानुसार भाजपकडे प्रचंड बहुमत आहे. भाजप 161, तर काँग्रेस 66 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष 3 जागांवर पुढे आहेत. मात्र, 41 जागांवर आघाडीचे अंतर 1 हजारांपेक्षा कमी आहे. बहुमतासाठी 116 जागांची आवश्यकता आहे. राज्यातील महाकौशलचा भाग वगळता सर्वच प्रभागांत काँग्रेसची पीछेहाट झाली आहे. महाकौशलच्या 38 पैकी 21 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.