
नागपूरः उपराजधानी नागपुरात शुक्रवार मध्यरात्री कोसळलेल्या पावसामुळे अनेक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेषतः खोलगट भागातील वस्त्यांमधील घरे आणि बाजारपेठांना पावसाच्या पुराचा तडाखा बसला. अंबाझरी परिसर, सीताबर्डीतील व्यापारी संकुले, नंदनवन झोपडपट्टी, हजारी पहाड परिसर, जुना बगडगंज परिसरात अनेक घरांमध्ये पाणी शिरले. सीताबर्डी परिसरात मोबाईलची दुकानं असलेल्या व्यापारी संकुलांच्या बेसमध्ये सात ते आठ फुट पाणी असल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. शहरात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमूंनी आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे. मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत असल्याची माहिती आहे.
नंदनवन परिसरातील झोपडपट्टी भागास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. याभागातील घरांची पडझड झाली आहे. घरांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी शिरले आहे.हजारीपहाड भागातही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती असून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली. हजारी पहाड नाल्यातील पाणी गोठ्यात शिरल्याने ही दुर्दैवी घटना घडली. गोठ्याचे व जनावरांचे मालक योगेश वऱ्हाडकर, राजेश वऱ्हाडकर आणि मृणाल भोगल यांचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांनी सांत्वन केले. तसेच, प्रशासनाला या घटनेचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. कुंभारपुरा जुना बगडगंज येथील नागरिकांना घरातुन सुरक्षित जागी जाण्याचे आवाहन करण्यात आले असून धोकादायक घरातील नागरीकांना घरांतून सुरक्षित जागी हलविण्यात आले आहे. दरम्यान, शहरात एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटात विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. अग्निशमन दल सुद्धा मदत कार्यात आहे.