



देशातील धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प
इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप साकार
पंढरपूर(PANDHARPUR) : महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपूरतर्फे “भूवैकुंठ प्रकल्प” या भव्य आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांना समर्पित असलेला हा प्रकल्प पंढरपूरच्या अध्यात्मिक वैभवाला नवे रूप आणि नवा सोपान देणारा ठरेल. चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर सुमारे १२ एकर भूमीवर उभारत असलेले हे केंद्र “भूवैकुंठ – पृथ्वीवरील वैकुंठ” म्हणून ओळखले जाईल.
येथे शुद्ध भक्ती, वारकरी परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम साधला जाणार आहे. सुमारे ३ लाख चौरस फुटांवर विस्तारलेला हा ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रकल्प आशिया खंडातील इस्कॉनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. यात भव्य मंदिर सभागृह, हजाराहून अधिक भाविकांसाठी निवास व्यवस्था, अन्नक्षेत्र (प्रसाद वितरण केंद्र), गोशाळा, संस्कृती रंगमंच, 7D थिएटर, प्रभुपाद संग्रहालय, तसेच आरोग्य व कल्याण सुविधा उभारल्या जात आहेत. मंदिरात श्री श्री राधा पंढरीनाथ, श्री श्री सीता-राम-लक्ष्मण-हनुमान, आणि श्री श्री गौर-निताई यांच्या मनोहर मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, हे मंदिर भाविकांसाठी दिव्य अनुभव आणि आत्मिक शांतीचे केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च ₹१५० कोटी असून, समर्पित भक्त, उदार दानदाते आणि हितचिंतक यांच्या सढळ योगदानातून हे भव्य कार्य पूर्णत्वास नेले जात आहे. इस्कॉन पंढरपूरने सर्व भाविकांना “पुंडलिक वीट सेवा” आणि “एक चौरस फूट मंदिर दान योजना” यांसारख्या विविध सेवांमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकल्पामागे इस्कॉन पंढरपूरची दूरदृष्टी, संघटनशक्ती आणि अद्वितीय टीमवर्क आहे. श्रीमान प्रल्हाद प्रभू यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही टीम, इस्कॉनचे संस्थापक-आचार्य श्रील प्रभुपाद यांच्या शिकवणुकीला जीवनात उतरवत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाने केवळ विटा-गिलावा नव्हे, तर भक्ती, सेवा आणि शिक्षणाचा जागर उभा केला आहे. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या स्फूर्तीने इस्कॉन पंढरपूरची टीम “भूवैकुंठ” प्रकल्पाला केवळ मंदिर म्हणून नव्हे, तर समाजकल्याण, संस्कृती संवर्धन आणि अध्यात्माचे केंद्र बनविण्यासाठी समर्पितपणे प्रयत्नशील आहे. येथे चालणारे अन्नदान, सांस्कृतिक वारसा संवर्धन, महिला व युवक सशक्तीकरण, आणि आध्यात्मिक शिक्षणाचे कार्यक्रम हे या मिशनचा अविभाज्य भाग आहेत.

हा संपूर्ण उपक्रम इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेतून उभा राहतोय. त्यांच्या टीमने सोबत या आध्यात्मिक उपक्रम कार्यासाठी स्वतःला प्रचंड वाहून घेतले आहे. या “भूवैकुंठ प्रकल्प” संदर्भात बोलतांना प्रल्हाद दास प्रभू म्हणाले की, “भूवैकुंठ हा केवळ मंदिर उभारणीचा प्रकल्प नाही; तो मानवतेच्या कल्याणाचा सशक्त संकल्प आहे. भक्ती, शिक्षण आणि सेवेच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात अध्यात्म आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. लाखो यात्रेकरूंना पंढरपूरात आल्यावर येथे प्रभुपादांच्या सेवेची, लोकनाथ स्वामींच्या करुणेची आणि भक्तांच्या प्रेमाची अनुभूती मिळेल.” भूवैकुंठ प्रकल्प पंढरपूरला एक जागतिक आध्यात्मिक गंतव्य बनवेल, जिथे भक्ती, संस्कृती, सेवा आणि विज्ञान यांचा समतोल साधणारे नवे युग सुरू होईल.
या पवित्र स्थळीच येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा सहभागासाठी संपर्क साधा www.iskconbhuvaikuntha.com info@iskconbhuvaikuntha.com 91-90962 53633















