
भंडारा ;- भंडारा जिल्ह्यातील पवनी,भंडारा,मोहाडी,तुमसर, लाखनी , साकोली, व लाखांदूर या तालुक्यात २७व २८ नोव्हेंबर रोजी निसर्गाच्या अवकृपेमुळे अवकाळी वादळी पाऊस बरसल्याने शेतातील पिकांची नासाडी झाली असून धान उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात सापडले आहेत .सततची नापिकी आणि अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेले शेतकरी चिंतातुर ,हवालदिल, वैफल्यग्रस्त झाले असतांना शासन आणि शासनाचे पदाधिकारी मात्र सुस्त बसल्याने धान उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असल्याचे चित्र
सकृतपने दिसून येत आहे त्यामुळे
अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या धान उत्पादक शेतकरी बांधवांचे अश्रू पुसून त्यांना आर्थिक मदतीचा दिलासा देण्यासाठी पालक मंत्री डॉ.विजय गावित हे वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यास भेट देतील काय असा प्रश्न ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी उपस्थित केला असून याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर या विरोधात रस्त्यावर उतरून राडा करण्यात येईल व याबाबतची संपूर्ण जबाबदारी शासन प्रशासनाची राहील असा इशारा दिला आहे.
ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते हे ओ बी सी मोर्चा चे संयोजक दिवाण भजनकर ,उपाध्यक्ष यशवंत सूर्यवंशी ,महिला अध्यक्षा शोभा बावनकर यांचेसह शेतकरी बंधवांसोबत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन प्रत्यक्ष धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली असता अवकाळी वादळी पावसामुळे धान पिकाचे नुकसान झाले असल्याचे प्रत्येक दर्शनी दिसून आले.
डॉ गावित यांनी भंडारा जिल्ह्याचे पालक मंत्री पद स्वीकारले आहे त्यामुळे पालक समजून त्यांनी प्रत्येक महिन्याला भंडारा जिल्ह्यात येऊन शेतकरी बांधवां सह सुशिक्षित बेरोजगार,शेतमजूर ,कामगार,गोरगरीब,शोषित पिडीत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याची नैतिक जबाबदारी पालकमंत्र्यांची असते .मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक भंडारा जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसामुळे धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या धान पिकासह ,भाजीपाला,फळवर्गिय पीक आणि रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले असल्याची दस्तुरखुद्द शेतकरी बांधवांची ओरड आहे त्यामुळे पालक मंत्र्यांनी भंडारा जिल्ह्याची भेट घेऊन शेतकरी बांधवांचे सांत्वन करणे गरजेचे असतांना त्यांचे याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष झाले असल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून अजून पर्यंत शासनाने मदत जाहीर केली नसल्याने शेतकरी चिंतातुर,हवालदिल, व वैफल्यग्रस्त झाले आहेत.यावरून
पालकत्व स्वीकारलेल्या पालकमंत्र्यांचे भंडारा जिल्हयाकडे दुर्लक्ष होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.याबाबत धान उत्पादक शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला असून भविष्यात या असंतोषाचा तीव्र भडका उडण्याची शक्यता आहे.
याबाबत पालकमंत्री डॉ गावित यांनी वेळीच दखल घेऊन भंडारा जिल्ह्यातील अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानीचा आढवा घेण्यासाठी आणि आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात येतील काय असा प्रश्न ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी उपस्थित केला असून यावेळी विकेश मेश्राम युवक सर्कल प्रमुख खमारी ज़िल्हा परिषद क्षेत्र,सुभाष तितीरमारे सर्कल प्रमुख खमारी क्षेत्र, हेमंत सेलोकर ग्रामपंचायत सदस्य, मधुकर तितीरमारे माजी उपसरपंच, मनोहर बोरकर, मंगेश बोरकर, सुद्धाकर तितीरमारे, राजेंद्र चव्हाण, संजू मते obc क्रांती ज़िल्हा अध्यक्ष, सुरेंद्र सर्वे उपस्थित होते.