‘विज्ञान जिज्ञासा’चा फिरता चषक भारती कृष्ण विद्याविहारला

0

प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीची प्रश्‍नमंजूषा स्‍पर्धा संपन्‍न

नागपूर (Nagpur), 5 ऑक्टोबर
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ विज्ञान या विषयातील ज्ञान वाढविण्याच्या उद्देशाने प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीतर्फे जागतिक अंतराळ सप्ताहाच्या नि मित्ताने घेण्‍यात आलेल्‍या ‘विज्ञान जिज्ञासा’ प्रश्नमंजूषा स्पर्धेचा प्रो. व्‍ही. जी. भिडे स्मृती फिरता चषक भारती कृष्ण विद्याविहारने पटकावला.

धरमपेठ स्थित प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्सप्लोरेटरीमध्‍ये शनिवारी घेण्‍यात आलेल्‍या या स्पर्धेत 21 शाळांच्‍या चमू सहभागी झाल्‍या होत्‍या. या स्पर्धेचे क्विझ मास्‍टर्स पद्मनाभन पिल्‍लई व अनिरूद्ध मुरारका हे होते.
बक्षिस वितरण कार्यक्रमाला मंचावर धरमपेठ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रत्नाकर केकतपुरे, अध्यक्ष अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर, प्रो. राजेंद्र सिंग एक्सप्लोरेटरीचे अध्यक्ष हेमंत चाफले, संचालक सीमा उबाळे तसेच, पद्मनाथ पिल्लई, अनिरुद्ध मुरारका यांची उपस्थिती होती.

मान्‍यवरांच्‍या हस्‍ते भारती कृष्ण विद्याविहारच्या अर्जुन लिचडे, युग गोयल, सानिध्य सोनटक्के यांना फिरता चषक देऊन सन्‍मानित करण्‍यात आले. आर. एस. मुंडले शाळेच्या निष्ठा काळे, अथर्व गायकी, भार्गव पाणुरकर यांनी द्वितीय क्रमांक तर महात्मा गांधी हायस्कूलच्या लावण्या व्ही. डोंगरे, सम्यक बागडे, हितार्थ बोडेले यांनी तृतीय क्रमांक पटकावला चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक ललिता पब्लिक स्कूलच्या समायरा घोडके, इशिका बेलखेडे, शौर्य निओडिंग यांना मिळाले.

अ‍ॅड. उल्हास औरंगाबादकर यांनी विजेत्या चमूंचे पारितोषिक देऊन कौतुक केले. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. कार्यक्रमाचे संचालन राधिका कायंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल लांजे यांनी केले.