

जयपूर: राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याविषयी प्रसार माध्यमांनी वर्तविलेले सारे अंदाज चुकीचे ठरवित भाजपने धक्का दिला आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma Rajasthan New CM) यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.( Rajasthan New CM) भजनलाल शर्मा हे भरतपूरचे असून ते सांगानेर मतदारसंघातून निवडून आले आहेत. मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप असतानाही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा 48,081 मतांनी पराभव केला. भजनलाल शर्मा हे संघ आणि भाजप संघटना या दोघांच्याही जवळचे मानले जातात.