

नागपूर (Nagpur) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नागपूरचा यंदाचा सर्वोत्कृठ नाट्य लेखनाचा पुरस्कार सदानंद बोरकर यांना जाहीर झाला असून नाट्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या समारंभात सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते डॉ. विलास उजवणे, नाट्यपरिषदेचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मा. प्रदीप दाते आणि नागपूर शाखेचे अध्यक्ष मा. अजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे.
माझं कुंकू मीच पुसलं, आत्महत्या, नवरे झाले बावरे, हा खेळ सावल्यांचा, कारस्थान, अस्सा नवरा नको गं बाई, बदनाम रस्त्याचा संघर्ष : गंगाजमुना आणि दोन घराचं गाव अश्या समाजिक नाटकांचे सदानंद बोरकर यांनी लिखान केले असून ह्या नाटकांचे हजारो प्रयोग रंगभूमीवर झालेले आहेत. आत्महत्या नाटकाची सार्क इंटरनॅशनल थिएटर मोहोत्सवासाठी निवड झाली असून भारताकडून ह्या नाटकाचे सादरीकरण झाले आहे. माझं कुंकू मीच पुसलं आणि आत्महत्या ही दोन नाटके गोंडवाना विद्यापीठात एम. ए. मराठी ला अभ्यासक्रमामध्ये समाविष्ठ झाली आहेत.
कलावंत म्हणून त्यांना शेकडो पुरस्कार असली तरी लेखक म्हणून त्यांना मिळालेला हा प्रतिष्ठेचा पहिलाच पुरस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. 14 एप्रिलला नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेच्या वर्धापन दिनाचे औचीत्य साधून सायंकाळी 5 वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, वोकार्ड हॉस्पिटल, राष्ट्रभाषा संकुल अंबाझरी मार्ग शंकर नगर नागपूर येथे हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेने एका पत्रकातून केले आहे.