बांगलादेशच्या खासदाराची भारतात हत्या

0

पोलिसांनी केली 3 मारेकऱ्यांना अटक

कोलकाता(Kolkata), 22 मे भारतात उपचारासाठी आलेले बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम(Anwarul Azim)यांची कोलकाता येथे हत्या करण्यात आली. उपचारासाठी ते 11 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये दाखल झाले होते.

भारतात बेपत्ता झालेले अवामी लीगचे खासदार अजमी अन्सार यांची कोलकाता येथील एका फ्लॅटमध्ये हत्या झाल्याचे आढळून आले. त्याचे मारेकरी बांगलादेशी असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. त्यांनी कट रचून खासदाराची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. खासदार अझीम कोलकाता येथून अचानक बेपत्ता झाले होते. कोलकात्याच्या राजारहाट येथील संजीव गार्डन हे त्यांचे शेवटचे लोकेशन होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला. मात्र, आज, बुधवारी बांगलादेशचे गृहमंत्री असदुजमान खान यांनी अझीमची हत्या झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मंत्री म्हणाले की, बांगलादेश पोलिसांनी खासदाराच्या हत्येप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडे मृतदेहाबाबत विचारणा केली असता, मंत्र्याने सांगितले की, त्यांना अद्याप याबाबत माहिती मिळालेली नाही. या प्रकरणी हत्येमागील कारणे लवकरच उघड करणार असल्याचे असदुजमान यांनी सांगितले. भारतीय पोलीसही या प्रकरणी माहिती गोळा करत आहेत. अन्वारुल अझीम हे अवामी लीग पक्षाचे तीन वेळा खासदार राहिले आहेत आणि ते कालीगंज उपजिल्हा युनिटचे अध्यक्षही आहेत. ते निवडून आलेल्या झेनैडा लोकसभा मतदारसंघ गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याची माहिती पुढे आलीय. दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी या घटनेबद्दल आश्चर्य आणि शोक व्यक्त केला आहे.