

बल्लारपूर येथे स्वतंत्र रेल्वे पोलिस ठाणे करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
चंद्रपूर,(Chandrapur):- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची मागणी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या माध्यमातून आ. मुनगंटीवार यांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा शासन दरबारी ठामपणे मांडत आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सदस्य रेल्वे उपभोगता सल्लागार समिती ( झेडआरयुसीसी) मध्य रेल्वे मुंबईचे श्री.अजय दुबे यांनी हा विषय आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या निदर्शनास आणून दिला होता. या विषयाची गांभीर्याने दखल घेत आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन, बल्लारशाह रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दूरक्षेत्र चौकीचे स्वतंत्र पोलिस ठाण्यात रूपांतर करण्याची लेखी विनंती सादर केली.