

नागपूर(Nagpur),13 जुलै:-मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशो कार्यरत बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या वतीने व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नाट्यगीत गायन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवार, 15 रोजी सकाळी 10.30 ते संध्याकाळी 4.30 या वेळेत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, सिव्हिल लाईन्स येथे होणा-या या महोत्सवात शहर व परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी होतील. सकाळी 10.30 वाजता होणा-या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाल रंगभूमी परिषदच्या अध्यक्षा आभा मेघे राहणार असून दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर प्रमुख पाहुण्या असतील. कार्यक्रमाला दमक्षेचे सहायक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय नागपूरचे सहायक संचालक संदीप शेंडे यांची उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण समारंभ संध्याकाळी 5 वाजता होईल.
या महोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहून बाल कलाकारांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन बालरंगभूमीच्या अध्यक्षा आभा मेघे, कार्याध्यक्ष संजय रहाटे, नाट्यगीत गायन महोत्सवाचे संयोजक डॉ. अनिल कवडे तसेच अनिल देव, किशोर बत्तासे व बालरंगभूमी परिषद नागपूर कार्यकारिणीने केले आहे.