
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष म्हणून ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकवर्तीय संजय सिंह यांची निवड झाल्याने आंदोलक कुस्तीपटूंनी आता महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केल्यावर आता बजरंग पुनियाने प्रतिष्ठित पद्म पुरस्कार परत पाठवत असल्याचे जाहीर केले आहे. पुनिया याने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पत्र पाठवून ही घोषणा केली आहे. (Bajrang Punia Return Padma Shri Award )
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय असलेले संजय सिंह यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) च्या निवडणुकीत नुकताच विजय मिळवला. संजय सिंह अध्यक्ष झाल्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगटसह अनेक कुस्तीपटू नाराज आहेत. साक्षी मलिकने गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली. आता बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. बजरंगने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. बजरंग पुनिया यांनी मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करत असल्याचे म्हटले आहे. बजरंग पुनिया याला २०१९ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.