

बदलापूर (Badlapur) :- देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असून नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र, तीन तास उलटूनही शाळा प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांची तक्रार दाखल करुन घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण नेमके कसे उघडकीस आले, याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. पीडितेपैकी एका लहान मुलीने आपल्या पालकांना लघवीच्या जागी दुखत असल्याचे सांगितले आणि हा प्रकार उघडकीस आला. हा संपूर्ण प्रकार अंगावर काटा आणणारा आहे. कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची अमानुष पद्धतीने हत्या केल्याच्या मुद्दयावरुन सध्या देशभरातली वातावरण तापले आहे. मात्र, मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार (Badlapur school girl sexual abuse) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी जयेश वाणी यांनी लिहलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये जयेश वाणी हा संपूर्ण प्रकार कसा उघडकीस आला, याबद्दल सांगितले आहे.