बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Badlapur case accused Akshay Shinde remanded to 14 days judicial custody

मुंबई:-बदलापूरमधील (Badlapur child abuse) एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंला अटक केली होती. त्यानंतर अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत साडेचार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अक्षय शिंदे याच्यावर असून त्याला अटक करण्यात आली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर बंदची हाक संतप्त नागरिकांनी दिली होती आणि रेलो रोकोही केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी कल्याण न्यायालयात हजर केले होते. यानंतर न्यायालयाने अक्षय शिंदेला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कल्याण न्यायालयातील न्यायाधीश वी ए पत्रावळे यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली होती. यानतंर आता आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी संपल्यानतंर पोलिसांनी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केले.

कल्याण न्यायालयाने आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांपर्यंत म्हणजेच ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यासोबतच याप्रकरणी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेचे अध्यक्ष, मुख्याध्यापिका आणि सेक्रेटरी यांना फरार आरोपी बनवण्यात आले आहे.

बदलापूर येथील शाळेत १२ आणि १३ ऑगस्ट रोजी छोटा शिशुमध्ये शिकणाऱ्या दोन साडेचार वर्षाच्या विद्यार्थ्यांनीवर शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने शाळेतील स्वच्छतागृहात लैगिंक अत्याचार केला होता. ही बाब १५ ऑगस्ट रोजी पालकांच्या लक्षात आली होती. मुलींना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले त्या वेळी ही बाब उघडकीस आली होती. दुसऱ्या एका पालकाने ही बाब १३ ऑगस्ट रोजीच शाळेतील शिक्षकांच्या लक्षात आणून दिली होती. परंतु, शाळा प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतली नाही. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी पीडित मुलीची वैद्यकीय चाचणीत हे स्पष्ट झाले की तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला होता.