
अयोध्या Ayodhya -अयोध्येत नव्या बांधलेल्या श्री राम मंदिरातील रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात Govindgiri Maharaj गोविंदगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यावर टीका करणाऱ्यांना गोविंदगिरी महाराज यांनी प्रत्युत्तर दिले आहे. एका वाहिनीशी बोलताना ते म्हणाले,“माझ्या आयुष्यात मी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशीही करणार नाही. प्रभू श्री राम आणि श्री कृष्णानंतर मला छत्रपती शिवाजी महाराज सर्वश्रेष्ठ वाटतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गुणांचे अनुसरण काहीजण करतात. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आहेत, हे सांगण्यात मला कुठलाही संकोच वाटला नाही. कारण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांचे अनुसरण पंतप्रधान आपल्या जीवनात करताना दिसत आहे. एखाद्या चुकीच्या गोष्टीवर आपण टीका करतो. त्याप्रमाणे सदगुणांचा गौरव करण्यात कुठलाही संकोच वाटत नाही. ज्यांची मने कोती असतात, मनात राजकारण भरलेले असते. त्यांच्या तोंडी अशा प्रकारच्या गोष्टी येतात,” असे प्रत्युत्तरही त्यांनी दिले.