
अयोध्या Ayodhya : अयोध्येतील नव्या राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा २२ जानेवारीला होत असून त्यासाठी व्यापक प्रमाणात तयारी सुरु आहे. या राम मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणाऱ्या मूर्तीची निवड झाली आहे. कर्नाटकचे (Karnataka) प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज (Arun Yogiraj) यांनी ही मूर्ती घडविलेली आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राकडून तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली. अरुण योगीराज हे या शिल्पकारांपैकी एक होते.
37 वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. इतकंच नाही तर अरुण योगीराज यांचे आजोबा वाडियार घराण्याच्या राजवाड्यांना सौंदर्य देण्यासाठीही ओळखले जातात. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांच्यावर शिल्पकलेचे संस्कार झाले आहेत. भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी ही माहिती जाहीर केलीय. बीएस येडियुरप्पा यांनीही शिल्पकार अरुण योगीराज यांचे त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. शिल्पकार अरुण योगीराज याबाबत बोलताना म्हणाले, “ प्रभू श्रीरामाची रेखीव आणि तेजस्वी मूर्ती घडवण्यासाठी निवडलेल्या देशातील तीन शिल्पकारांपैकी मी एक होतो, याचा मला खूप आनंद होतो.” शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकातील म्हैसूर शहरातील रहिवासी आहेत. अरुण योगीराज यांना शिल्पकलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे. त्यांच्या पाच पिढ्या रेखीव मूर्ती घडवण्याचे काम करतात. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण यांच्या कौशल्याचं कौतुक केले आहे. अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा घडवला होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छत्रीखाली हा पुतळा उभारण्यात आला आहे.