दिवाळी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यात सायबर सुरक्षा संदर्भात करण्यात येत आहे जनजागृती

0

चंद्रपूर(Chandrapur) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी वाढत असताना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे. सायबर पोलीस स्टेशनच्या पथकांकडून चंद्रपूर बसस्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. प्रवाशांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहाराविषयी माहिती देण्यात येऊन जनजागृतीसाठी पॉम्पलेट वाटप करण्यात आले. नागरिकांनी ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० किंवा १९४५ वर संपर्क साधावा, तसेच cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मोबाईल हरवल्यास ceir.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंद करून तो ब्लॉक करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या. दिवाळी ऑफर्सच्या नावाखाली फेक वेबसाईट्स, क्यूआर कोड स्कॅम, बनावट कुपन कोड्स यांसारख्या फसवणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहे ऑक्टोबर हा राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरुकता महिना म्हणून पाळण्यात येत असून, या निमित्त विविध शाळा, महाविद्यालये आणि शासकीय तसेच औद्योगिक संस्थांमध्ये सायबर सुरक्षा संबंधित जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचे उपक्रम सातत्याने सुरू आहेत.