

नागपूर(Nagpur), 19 जून :- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्यावतीने नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात रंगभूमीवरील उल्लेखनीय योगदानासाठी नागपुरातील प्रतिथयश नाट्यअभिनेत्री, दिग्दर्शक व निर्माती दीपाली घोंगे यांना ‘कै. कमलाकर वैश्यंपायन सर्वोत्कृष्ट एकपात्री कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागपूर व विदर्भाच्या नाट्यक्षेत्रासाठी ही अतिशय गौरवास्पद बाब ठरली आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ नाट्य व सिने अभिनेते अशोक सराफ(Ashok Saraf), नाट्य संमेलनाध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते दीपाली घोंगे(Dipali Ghonge) यांना सन्मानित करण्यात आले.
दीपाली घोंगे यांनी युगंधर, महारथी कर्ण, कृष्णा बावरी, हरहर गंगे, राम आदी नाटकांचे दिग्दर्शन व निर्मिती केली असून त्यांचे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, हॅम्लेट, झाशी राणी लक्ष्मीबाई आदी एकपात्री प्रयोग लोकप्रिय आहेत. स्वामी विवेकानंद, भगवान श्रीकृष्ण अशा महापुरूषांच्या तसेच, विलियम शेक्सपिअरच्या हॅम्लेट नाटकातील हॅम्लेटची भूमिका साकारणा-या त्या एकमेव स्त्री कलावंत आहेत.