

– गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार
नागपूर : महानगरपालिकेच्या आग्याराम देवी चौकस्थित संत तुकडोजी महाराज, क्रीडा संकुलावर अनधिकृतरित्या कब्जा करण्याचा प्रयत्न कंत्राटदारामार्फत करण्यात आला. यासंदर्भात मनपाद्वारे गणेशपेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली.
आग्याराम देवी चौक येथे मनपाच्या मालकीचे संत तुकडोजी महाराज क्रीडा संकुल आहे. सदर क्रीडा संकुलाचे देखभाल दुरुस्तीचे काम कंत्राटदार शैलेंद्र मधुकरराव घाटे (वय 51 वर्ष) यांच्याकडे होते. त्यांचा कंत्राट संपुष्टात आला असूनही यांच्यामार्फत संकुलामध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला .अखेर संकुलाला कुलूप लावणे, गाड्या ठेवणे, कर्मचाऱ्यांना धमकी देणे याप्रकरणी त्यांच्या विरोधात मनपाचे क्रीडा अधिकारी डॉक्टर पियुष आंबुलकर यांच्यामार्फत गणेशपेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कंत्राटदार शैलेंद्र मधुकरराव घाटे (वय 51 वर्ष) यांचा कंत्राट संपुष्टात आल्यानंतर संकुलात ठेवण्यात आलेले व्यायाम साहित्य टेबल खुर्ची लोखंडी कपाट घेऊन जाण्याकरिता पत्र देण्यात आले होते. मात्र पत्र देऊन सुद्धा अद्याप त्यांनी साहित्य परत नेले नाही.
मागिल काही दिवसांपासून कंत्राटदाराद्वरे बिनाकारण संकुलामध्ये येवून कर्मचा-यांना शिविगाळ करणे व जबरीने स्वतःच्या चारचाकी गाडी पार्क करणे इत्यादी कृती करून मनपाच्या कामात अडथळे निर्माण केला जात आहे. तसेच शुक्रवार दिनांक 30 जून रोजी कंत्राटदारातर्फे नागपूर महानगर पालिकेतर्फे लावण्यात आलेल्या स्विमिंग पुलवर लागलेले लोखंडी चॅनल गेटवर स्वतःचे साखळी लावून कुलूप लावले तसेच बाहेरच्या परिसरातील गेटवर, दारांवर देखील बळजबरीने कुलूप लावून संकुलावर स्वतःचा ताबा करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर क्रीडा अधिकारी यांनी कर्मचा-यांसह पाहनी केली असता तेथे कंत्राटदाराद्वरे स्वतःचे कुलूप लावल्याचे निर्देशनात आले.