

सर्वव्यापी असलेल्या प्र. के. अत्रेंचे कार्य ख-या अर्थाने उलगडले
नागपूर (Nagpur), 6 ऑगस्ट
साहित्य सम्राट प्रल्हाद केशव उर्फ आचार्य अत्रे यांचे कार्य आजवर तुकड्या तुकड्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहिले पण ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमातून त्यांच्या सर्वव्यापी अशा कार्याचा ख-या अर्थाने नागपुरकरांना उलगडा झाला. शिक्षक, नाटककार, चित्रपटकार, कवी, विडंबनकार, लेखक, राजकारणी, पत्रकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य विविध गाणी, कविता, विनोद, अभिनय, चित्रफित अशा अनेक माध्यमातून रसिकांसमोर येत गेले आणि अत्रेबद्दलच्या अभिमानाने सभागृह तुडूंब झाले.
प्रसंग होता, साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ हा खास कार्यक्रमाचा. मुंबईच्या ‘चौरंग’ या संस्थेतर्फे प्रस्तुत व महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे आयोजित हा कार्यक्रम सोमवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडला. कार्यक्रमाला उपस्थित संस्कार भारतीच्या अध्यक्ष कांचन गडकरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्योजक प्रशांत उगेमुगे, डॉ. संजय उगेमुगे, प्रफुल्ल फरकासे, संजय राहाटे, शशांक शेंडे यांच्या हस्ते लेखक, दिग्दर्शक व निर्माते अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम आनंद देणारा व अभिमान वाटवा असा असल्याचे मत डॉ. शोभणे यांनी व्यक्त केले तर कांचन गडकरी यांनी शाळा, महाविद्यालयांमध्ये याचे प्रयोग झाल्यास विद्यार्थ्यांपर्यंत प्र.के. अत्रे यांचे कार्य पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अशोक हांडे यांच्या साभिनय निवेदनाने अत्रे यांचे बालपण, त्यांचे काव्य, विनोदी लेखन, नाट्यलेखन, भाषणांचा पट उलगत गेला. त्याला ऊठी गोपालजी, आजीच्या जवळी घड्याळ, सत्वर पाव ग मला, ‘छडी लगे छम छम’, ‘प्रीती सुरी सुधारी’ ‘तू बोलल्याविणा मी नाहीच हासणार’, ‘लाखात बायको अशी देखणी’, ‘प्रीती सुधा ही’, ‘गरगर फिरवू चरखा’ अशा विविध सुमधूर गाण्यांच्या पेरणीने अधिक खुमासदार केले. अत्रेचे पत्रातून फुललेले प्रेम, नवयुग व्याखानमाला, दिनूचे बील, तो मी नव्हेचा प्रसंग अशोक हांडे यांनी अभिनयातून उभा केला. स्वातंत्र्यलढा, विविध सामाजिक व राजकीय चळवळी, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, असे अत्रे यांच्या जीवनातील विविध टप्पे अशोक हांडे यांच्या कथा निवेदांनातून आणि कलाकारांनी सादर केलेल्या समर्पक गीतांतून उलगडत गेले. सशक्त लेखणीतून उभ्या राहिलेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.
चौरंगच्या ५० कलाकारांनी हा कार्यक्रम अतिशय दर्जेदार पद्धतीने सादर केला. कार्यक्रमासाठी आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै आणि नातू ॲड. राजेंद्र पै यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. संगीत संयोजन महेश खानोलकर यांचे होते तर प्रमोद सोहोनी, सचिन मुळ्ये, रुद्रेश कानविंदे मैथिली जोशी, स्मिता जोशी आणि निलाक्षी पेंढारकर हे गायक कलाकार आणि महेश खानोलकर, नीला सोहोनी, सत्यजित प्रभू अमित गोठीवरेकर, अभिमान आपटे, मंदार पेडणेकर, अविनाश मयेकर, नारायण साळुंके, भावेश पाटील, राहुल मयेकर, गोविंद हडकर, गौतम सोनावणे, रेणूका पानसे या कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला.