अशोक चव्हाणांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची पुन्हा चर्चा

0

नांदेड- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लवकरच भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरु झाल्याने काँग्रेस पक्षात प्रचंड खळबळ माजली आहे. नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. अलिकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. (Congress Leader Ashok Chavhan)
शुक्रवारी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला. महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही. मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे. तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हे भाजप मध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया काही मिळू शकली नाही. भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे.