

नाट्य शिबिराचा थाटात समारोप
नागपूर(Nagpur):- 2 जुन स्वानंद सांस्कृतिक मंडळाद्वारे मागील 26 वर्षांपासून सातत्याने नाट्यशिबिरांचे आयोजन करण्यात येत असून अशा शिबिरांमधूनच कलावंत घडत असतात, असे मत स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
स्वानंद सांस्कृतिक मंडळ व स्त्री शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या एक महिन्याच्या नाट्य कार्यशाळेचा शनिवारी थाटात समारोप झाला.श्रीमती दादीबाई देशमुख हिंदू मुलींची शाळा येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस होते तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे अध्यक्ष अजय पाटील, स्वानंद सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मिरज घाटे, बाल अकादमीच्या कार्याध्यक्ष सीमा फडणवीस, बालरंगभूमी परिषद नागपूर शाखेच्या उपाध्यक्ष रुपाली कोंडेवार-मोरे, हिंदू मुलींची शाळाच्या मुख्याध्यापिका माया बमनोटे व शिबिर संयोजक रोशन नंदवंशी यांची उपस्थिती होती.
रवींद्र फडणवीस(Ravindra Fadnavis) यांनी रोशन नंदवंशी यांचे सातत्य, निष्ठा आणि मेहनतीचे कौतुक केले. रुपाली कोंडेवार-मोरे व अजय पाटील यांनी महिनाभर चाललेल्या या कार्यशाळेत शिबिरार्थींनी केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले व त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. मधुकर आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन देवश्री नंदवंशी व गार्गी कुलकर्णी यांनी तर प्रास्ताविक कौमुदी साल्पेकर यांनी केले या महिन्यावर चालणाऱ्या मधुकर आंबेकर, भाग्यश्री चौधरी, कस्तुरी वखरे व वरद रामेकर यांना उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून सत्कार करण्यात आला. अंश केदार याने आभार मानले.