नागपुरातील कलावंत आणि तंत्रज्ञ २१ सप्टेंबरला येणार एकाच मंचावर

0

नागपुरातील फिल्म इंडस्ट्री विषयावर चर्चासत्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर:- नागपुरात फिल्मसिटी तयार होत आहे. मात्र वैदर्भीय कलाकार म्हणून आपण भविष्यातील या फिल्म इंडस्ट्रीसाठी तयार आहोत का, या विषयावर चर्चा करण्यासाठी नागपुरातील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना एकत्र आणण्याचे काम फिल्म टेलिव्हिजन अँड थिएटर सोसायटीने केले आहे. विविध क्षेत्रातील हे कलावंत आणि तंत्रज्ञ रविवार, २१ सप्टेंबर रोजी एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. चित्रपट आणि कलाक्षेत्राच्या संवर्धनासाठी झटणारी फिल्म टेलिव्हिजन अँड थिएटर सोसायटी आणि ललित कला विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २१ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता गुरुनानक भवन, ललित कला विभाग कॅम्पस येथे नागपुरातील प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञांचा मेळावा होणार आहे. राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते या मेळावा आणि चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात विदर्भातील प्रमुख व निवडक थिएटर, फिल्म कलावंत, मॉडेल्स, लेखक, गीतकार, संगीत दिग्दर्शक, गायक, छायाचित्रकार, आर्ट डायरेक्टर, फॅशन डिझायनर, कॉश्च्युम डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, फिल्म क्रिटिक, यूट्युबर, इन्फ्लुएन्सर, कंटेंट क्रिएटर, इव्हेंट मॅनेजर, फिल्म एडिटर, व्हीएफएक्स आर्टिस्ट, अॅनिमेटर, एआय आर्टिस्ट आदी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ‘भविष्यात फिल्म इंडस्ट्री या व्यवसायासाठी आम्ही तयार आहोत का..?’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातील दिग्गज कलावंत अभिनेता व दिग्दर्शक देवेंद्र दोडके, नरेश गडेकर, ललित कला विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. संयुक्ता थोरात, अभिनेता व दिग्दर्शक संजय भाकरे, लेखक-फिल्ममेकर शैलेंद्र बागड़े, सिने समीक्षक-लेखक अभिषेक खुळे, फिल्ममेकर नितीन बन्सोड, साउंड इंजिनीअर चारुदत्त जिचकार, फिल्म एडिटर मिलिंद कुलकर्णी, अभिनेत्री-वेशभूषाकार किरण बागडे, अभिनेत्री रूपाली मोरे, लेखक आणि गीतकार अमन कबीर, कला दिग्दर्शक नाना मिसाळ, टेक्निशियन किशोर बत्तासे, प्रसिद्ध रंगकर्मी-चित्रपट दिग्दर्शक सलीम शेख, फिल्ममेकर विजय गुमगावकर इत्यादी कलावंत वक्ता सहभागी होणार आहेत.
विदर्भातील क्रिएटिव्ह इकोसिस्टीमला एकत्र आणणे, कलाकारांना परस्पर संवाद साधता यावा व उद्योगातील नव्या संधी जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. विदर्भातील सर्व उदयोन्मुख तसेच प्रस्थापित कलाकार, तंत्रज्ञ व रसिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन फिल्म टेलिव्हिजन अँड थिएटर सोसायटी संस्थेच्या संयोजक विभा गजभिये, शुभम डोंगरे, जान्हवी मेश्राम, संघर्ष भालाधारे, देवेन पानतावणे आणि रॉनी झरबड़े यानी केले आहे.