नागपूर – २०१९ ला ३७० कलम हटविण्याच्या निर्णयाला आम्ही पाठींबा दिला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला, त्याचं मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. सोमवारी दुपारी हिवाळी अधिवेशनात हजर राहण्यासाठी आले असता नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनीधींशी संवाद साधताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, न्यायालयानं सप्टेंबरपर्यंत निवडणूका घ्यायला सांगितल्या आहेत. त्या निवडणूका घेण्यापूर्वी जर का पाकव्याप्त काश्मिर घेऊ शकलो, तर संपूर्ण काश्मिरमध्ये एकत्र निवडणूका झाल्यास देशवासियांना आनंदच होईल.
परिस्थितीमुळे घर सोडून गेलेले काश्मिरी पंडीत निवडणूकांपूर्वी पुन्हा सगळेच्या सगळे काश्मिरमध्ये परत येतील ह्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी देतील? का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. काश्मिरी पंडीतांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रात आसरा दिला होता. ते निवडणुकीपूर्वी घरी परततील आणि खुल्या वातावरणात ते मतदान करू शकतील का? यावरही त्यांनी भर दिला.














