

व्हिंटेज कार रॅलीने ‘नागपूर कला संघ’ कला महोत्सवाचे थाटात उद्घाटन
नागपूर (Nagpur), महाराष्ट्र, 21-09-2024: नागपूर कला संघ, युज आर्ट्स फाउंडेशनद्वारे समर्थित सार्वजनिक कला महोत्सवाची दुसरे पर्वाचे नागपूर महापालिकेचे आयुक्त आयएएस अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नागपूर कला संघच क्युरेटर सुमी गुप्ता, रोहन आनंद, राजीव रंजन यांची उपस्थिती होती. डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्हिंटेज कार रॅलीला हिरवी झेंडी दाखवून नागपूर कला संघचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर चित्रकार विनय चानेकर व त्यांच्या टीमने आपल्या चित्रकारीने रंगवलेल्या कला ‘कार’ चे त्यांनी विमोचन केले. त्यांनी चानेकर यांच्याकडून कारसंदर्भात सर्व माहिती जाणून घेतली व त्यांची कल्पनाशक्ती व कलात्मकतेचे कौतुक केले. त्यानंतर, श्री कला महाविद्यालयातील कलाकारांच्या ‘जोगवा’ लोकनृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले.
यावर्षीची नागपूर कला संघाची मध्यवर्ती संकल्पना ‘ट्रान्सेंडिंग बाउंडरिज’ अशी असून, कलाकारांना त्यांची दृष्टी, कल्पनाशक्ती आणि कलात्मक प्रतिभा प्रतिबिंबित करणाऱ्या नावीन्यपूर्ण कलाकृती आणि शिल्पे तयार करण्यासाठी हा महोत्सव प्रोत्साहित करीत आहे.
उद्घाटनानंतर विदर्भातील शाही विणकरांच्या वारसाला आदरांजली वाहणारे करवथ काठी साडी विणकामाचे प्रदर्शनही दाखविण्यात आले. याला पूरक म्हणजे माती आणि टेराकोटा भांडी बनविण्याची कार्यशाळाही पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्यामल देशमुख यांनी केले.