News Update : छत्तीसगडमध्ये सैन्याने 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू

0
छत्तीसगडमध्ये सैन्याने 8 नक्षलवाद्यांचा खात्मा
1 जवान शहीद, 2 जखमी
छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूरच्या अबुझमाड येथील कुतुल भागात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी 8 माओवाद्यांचा खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा आकडा आणखी वाढू शकतो. या चकमकीत एक जवान शहीद झाला असून दोन जवान जखमी झाले आहेत. जवानांनी नक्षलवाद्यांच्या अड्ड्याला वेढा घातला आहे. एक दिवस अगोदरही दिवसभर सैनिकांच्या या संयुक्त पथकात अधूनमधून गोळीबार होत होता. 15 जूनच्या सकाळपासून पुन्हा चकमक सुरू आहे.
भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप;
सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात संततधार पावसाने झालेल्या भूस्खलनामुळे १५ परदेशी नागरिकांसह १२०० हून अधिक पर्यटक अडकले आहेत. एका अधिकाऱ्याने शुक्रवारी ही माहिती दिली. राज्यात भूस्खलन आणि मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
 जवळवास १२०० हून अधिक पर्यटक हे मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. सिक्कीम पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे प्रधान सचिव सी एस राव यांनी एका निवेदनात याबाबत माहिती दिली आहे. मंगन जिल्ह्यातील लाचुंगमध्ये भारतातील तीन, बांगलादेशातील १० जण अडकले आहेत.
——————————–
भुजबळांना नक्कीच दु:ख झालं असेल
 अनिल देशमुख यांचं मोठं विधान
आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची असेल. काही इश्यूबद्दल बोलायचं असेल. जेव्हा मोठी मिटिंग असते तेव्हा सर्व नेत्यांना बोलावलं जातं. आमच्या आघाडीत कोणी मोठा आणि छोटा भाऊ नाही. आम्ही सर्व एकत्र आहोत. एकोप्याने काम सुरू आहे. पुढची विधानसभा आहे, ती आम्ही एकत्र बसून लढू आणि जिंकू, असं माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.आता मला राजकारणात 40 वर्ष झालीत. मला संसदेत जायचं होतं. ही इच्छा मी बोलून दाखवली होती. मला लोकसभा मिळाली नाही. राज्यसभाही मिळाली नाही. सहा वर्षापूर्वीही मी राज्यसभेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाही निर्णय घेतला गेला नाही, अशी खदखद राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांच्या या विधानानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. या सर्व प्रकरणावर छगन भुजबळ आता खुलेआमपणे बोलत नसतील. पण त्यांना मनातून नक्कीच दु:ख झालं असेल, असं शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
———————————
छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलले गेले
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
छगन भुजबळ पक्षात वरिष्ठ असताना डावलले गेले. कारण तिकडे साठमारी होत आहे. त्यांच्या पक्षात ज्यांना जे मिळेत ते ते ओरबडून खाल्ले जात आहे. राज्यातील सरकार कमिशन खोर सरकार झाले आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
———————————-
राज ठाकरे बाहेर पडले, पण त्यांनी पक्ष फोडला नाही, 
मनसे नेत्याचे भुजबळांवर टीकास्त्र
राज ठाकरे बाहेर पडले मात्र त्यांनी पक्ष फोडला नाही. बाळासाहेबांना सांगून ते बाहेर पडले. भुजबळ राजकीय स्वार्थासाठी पक्ष बदलत राहिले. भुजबळ स्वतःचा इतिहास विसरत आहेत शरद पवारांच्या नादी लागून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारे भुजबळ आहेत, अशा शब्दांत मनसे नेत्याने भुजबळांवर टीका केली.
स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करा –
 आ. किशोर जोरगेवार यांची मागणी
  चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, राज्यातील वीज ग्राहकांना सरसकट स्मार्ट प्री-पेड वीज मीटर जोडणीची सक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, या अधिवेशनात सरकारकडून याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.       आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, स्मार्ट प्री-पेड वीज मीटर बाबत जनतेमध्ये रोष आहे. त्यामुळे जनतेला मान्य नसलेल्या या मीटर जोडणीची सक्ती तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. आज मुंबई मंत्रालय येथे झालेल्या या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू
 हा अपघात आहे की आत्महत्या
मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची सुद्धा शक्यता आहे. ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
जेईई, नीट प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया सुरु
बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरीता सुविधा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी जेईई (JEE) आणि नीट (NEET) या प्रवेश परीक्षांचे नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षणासाठी ऑनलाईन प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. बार्टीमार्फत मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर व नागपूर या ठिकाणी प्रत्येकी JEE-100 व NEET-100 जागांकरिता प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
18 जून रोजी येणार पीएम किसान योजनेचा हप्ता
 सन्मान निधी योजनेच्या 17 वा हप्त्याला मंजूरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथविधी होताच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 17 वा हप्त्याला मंजूरी दिली. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी योजनेचा 16 वा हप्ता या वर्षी फेब्रुवारी महिन्यात जमा केला होता. यवतमाळ-नागपूर रस्त्यावरील भारी येथे त्यांचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्यांनी एक बटण दाबून हा पैसा हस्तांतरीत केला होता. पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता कधी जमा होणार याविषयीची उत्सुकता होती. शेतकऱ्यांना पेरणीच्या कालावधीत ही थोडीफार होणारी मदत कामाला येणार आहे. त्यामुळे शेतकरी दोन हजार रुपयांची प्रतिक्षा करत आहेत. एका माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काशीला जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान 18 जून रोजी ते पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जमा करतील.
————————————-
थेट मोबाईल क्षेत्रात उडी घेण्याची तयारी
टाटांचा मेगा प्लॅन
देशातील सर्वात विश्वार्ह कंपनी असलेला टाटा समूह नवीन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत आहे. सुईपासून विमाने बनवण्यापर्यंत मजल मारणारी ही कंपनी आता स्मार्टफोन उद्योगात उतरणार आहे. एका दशकापूर्वी टाटा समूह मोबाइल नेटवर्क आणि हॅडसेट बनवत होती. परंतु आता स्मार्टफोन बनवणार आहे. त्यासाठी चीनमधील दिग्गज मोबाइल कंपनी वीवो (Vivo) खरेदी करण्याची तयारी टाटाने चालवली आहे. जर हा करार पूर्ण झाला तर या कंपनीत 51 टक्के शेअर टाटा कंपनीचे असणार आहे. त्यामुळे विदेशातील कंपनीचे सर्व नियंत्रण देशातील टाटा समुहाकडे येणार आहे.
—————————-
फेसबूकवर मैत्री, गिफ्टचं आमिष
 ट्यूशन टीचरला लाखोंचा गंडा
सोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावरून मैत्रीचं जाळं टाकून, अनेकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात. मुंबईतील एका शिक्षिकेला अशाच फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि तिला तब्बल 8 लाख रुपयांना लुटण्यात आलंसोशल मीडियाचा वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र याच सोशल मीडियावरून मैत्रीचं जाळं टाकून, अनेकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात. मुंबईतील एका शिक्षिकेला अशाच फसवणुकीला सामोरं जावं लागलं आणि तिला तब्बल 8 लाख रुपयांना लुटण्यात आलं. 68 वर्षांच्या एक महिलेशी भामट्याने फेसबूकवरून ओळख वाढवली. आणि गिफ्ट देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून लाखो रुपये लुटले. आपण इंटरनॅशनल पायलट असल्याचं भासवत त्याने त्या महिलेशी मैत्री केली होती. याप्रकरणी माहिम पोलिस स्टेशनमधये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.