
नागपूर, 03 डिसेंबर : छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर पोहचला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा या विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हंटले आहे.
नागपूर : क्रिकेट वर्ल्डकप फायनल मॅचमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमुळे पनवती (अपशकुन) होऊन भारत हरल्याची टीका काँग्रेसने केली होती. त्यानंतर सोशल मिडीयामध्ये मोदींना प हिणवले जात होते. आता पनवती कोण आहे हे काँग्रेसला कळले असेल. त्यामुळे आता पुन्हा राहुल गांधी किंवा काँग्रेसचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असे शब्द वापरणार नाहीत असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर असताना फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा या विजयाचे शिल्पकार असल्याचे सांगितले.
फ़डणवीस यांनी नागपुरातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले, अमित शाह मास्टर स्ट्रेटेजिक ठरले आणि नड्डांनी पक्षांची योग्य बांधणी करून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला. त्याबळार भाजपला 3 राज्यात चांगले यश मिळाले. यावेळी फडणवीसांना काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपच्या मतांमध्ये 10 टक्क्यांची वाढ झालीय. छत्तीसगडमध्ये 14 आणि मध्यप्रदेशात 8 टक्के मते वाढली आहेत. यावरून जनतेचा भाजपावर विश्वास असल्याचे दिसून येते. कल पाहिले तर तीन राज्यांमधील 639 जागांपैकी 339 जागा भाजपाने जिंकल्या आहेत. एकंदर 50 टक्क्यांहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या आहेत. हा निकाल जनतेच्या मनात काय आहे त्याची नांदी आहे. लोकसभेत जो अभूतपूर्व विजय भाजपाला आणि एनडीएला मिळणार त्याची सुरुवात आहे. विरोधकांच्या आयएनडीए आघाडीला लोकांनी नाकारल्याचे हे द्योतक असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. विरोधकांना टोला लगावताना फडणवीस म्हणाले की, या निवडणूक निकालानंतर आता आयएनडीए आघाडीची बैठक होईल आणि त्यात पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जाईल अशी टीका देखील फडणवीसांनी याप्रसंगी केली.