
डॉ. राजीव पोतदार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश — कळमेश्वर गोंडखैरी उड्डाणपूलास मंजुरी
नागपूर (Nagpur) :कळमेश्वर–गोंडखैरी रेल्वे क्रॉसिंगवर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून डॉ. राजीव पोतदार यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याची दखल घेत उड्डाणपूल मंजूर केला आहे. या उड्डाणपुलाचे भूमिपूजन शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या पुलाची मागणी स्थानिक नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी डॉ. राजीव पोतदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या उड्डाणपुलाचे भूमिपूजन २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
कळमेश्वर–गोंडखैरी मार्गावर मोठी औद्योगिक वसाहत असून दररोज अनेक कर्मचारी आणि अधिकारी या मार्गाने प्रवास करतात. मात्र रेल्वे फाटक वारंवार बंद राहिल्यामुळे कामावर वेळेत पोहोचणे कठीण होत होते. याशिवाय या मार्गावर सावंगी, सेलू, लिगा, उपरवाही, कळंबी, आष्टी, केतापार, लोणारा अशी अनेक गावे आहेत. या गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी, शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणि नागरिक विविध शासकीय कामांसाठी कळमेश्वर येथे येत असतात.
नागपूर–दिल्ली रेल्वे मार्गावर असलेले हे फाटक दिवसभरात अनेकदा बंद राहत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे. मात्र, आता उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे हा त्रास कायमचा दूर होणार आहे, आणि कळमेश्वर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.