


एमएसएमई चे सहायक संचालक मिश्रा यांनी केले मार्गदर्शन
नागपूर(Nagpur), ता. ०३: महाराष्ट्रातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसाय वाढीसाठी विचार व कृती करण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट‘ नागपूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी नोबल इन्फ्राटेकचे संचालक श्री बागेश महाजन(Shri Bagesh Mahajan) यांची तर विदर्भ समन्वयक म्हणून श्री प्रफुल हातगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी (ता. ०३) सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित रेगुलर मिटिंग मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री. सुभाष गोरे, एमएसएमई चे सहायक संचालक श्री. राहुलकुमार मिश्रा, नागपूर चॅप्टरचे सचिव अश्विनी ऋषी, कोषाध्यक्ष श्री. शरद अरसडे उपस्थित होते.
व्यावसायिकांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु या योजनांची माहिती नसल्यामुळे अनेक उद्योजक या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. त्यामुळे क्लब मधील सदस्यांना या योजनांची माहिती व्हावी व लाभ घेता यावा यासाठी सॅटर्डे क्लब नागपूर चॅप्टरने पुढाकार घेतला. शनिवारच्या रेगुलर व्यावसायिक बैठकीत एमएसएमई विषयावर एक सत्र घेण्यात आले. सत्रात एमएसएमई चे सहायक संचालक श्री राहुलकुमार मिश्रा यांनी याअंतर्गत येणाऱ्या संपूर्ण योजनांची सादरीकरणाद्वारे माहिती देऊन मार्गदर्शन केले. यात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, राष्ट्रीय एससी/एसटी हब योजना, स्टँड-अप इंडिया योजना, क्रेडिट गॅरंटी फंड योजना, बिझनेस इनक्यूबेटर, खरेदी आणि विपणन समर्थन योजना, कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्रॅम, बारकोड, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म (एमएसएमई ग्लोबल मार्ट, रिटेल आउटलेटचा विकास, मार्केटिंग सपोर्ट (जेम), सूक्ष्म आणि लघु उद्योजकांसाठी सार्वजनिक खरेदी धोरण, बौद्धिक मालमत्ता अधिकार, झेड योजना, पेमेंट विलंब, मुद्रा लोन, लिन मॅन्युफॅक्चरिंग कंपेटिटिव्हनेस प्रोग्राम, निर्यात योजना, क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, स्फूर्ती योजना आदी योजनांचा यात समावेश होता. यावेळी श्री राहुलकुमार मिश्रा यांनी सर्व व्यावसायिकांनी एमएसएमईच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच यासंबंधी कोणतीही मदत लागल्यास पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
बैठकीला उपस्थित सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री. सुभाष गोरे यांनी क्लब विषयी माहिती सांगितली. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्रीयन उद्योजकांच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी सॅटर्डे क्लब हे उत्तम व्यासपीठ आहे. राज्यात १०० पेक्षा जास्त चॅप्टर्स असून यात ४ हजार पेक्षा अधिक सदस्य जुडलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रीयन व्यावसायिकाला आपले व्यवसाय वाढविण्यासाठी या नेटवर्क चा खूप मोठा फायदा होत आहे. एवढेच नाही तर आता सॅटर्डे क्लब चे इंदोर आणि गुजरात मध्ये सुद्धा चॅप्टर सुरु झाले आहे अशी माहिती यावेळी गोरे यांनी दिली. पुढे ते म्हणाले, संपूर्ण व्यावसायिक समस्यांचे समाधान म्हणजे ‘सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट’ आहे.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष श्री बागेश महाजन म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी एवढी मोठी जबाबदारी स्वीकारली आहे. आपण सर्व मिळून नागपूर चॅप्टर ‘डन डील्स’ मध्ये सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी प्रयत्न करू. तसेच ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ हे ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेऊन कार्य करेन.
बैठकीला इनव्हिजनएआर चे भुलेश्वर माटे, आयसीटी मीडियाचे संचालक अमित बोरकर,फोर्ग नेक्सटेक चे अथर्व असलकर, श्री उद्योग चे विजय सोनपराते, MNJ कंसल्टंट चे देवांशीश जोशी, विराज शिपिंग अँड लॉजिस्टिकचे शशांक लाडोळे, श्वेता बुटिकच्या श्वेता सहस्रभोजनी, तेजस इन्शुरन्स चे प्रकाश वाघमारे, विडी कॉम चे दीपक सोनावणे, अमित केबल नेटवर्क चे नितीन सागळे, रूम अँड स्पेस च्या ऋतुजा आढाव, क्रिएटिव्ह छत्री च्या चैताली बांगरे, जैविक च्या गौरवी करंदीकर, दिवे बंधू चे कौस्तुभ दिवे, सीए चैत्र सालनकर, फायर निगेट सोल्युशन चे रजत तालुकदार, हेस्टन सोल्युशन च्या हेमलता जवंजाळ, रजत फोटोग्राफी चे रजत बनकर, श्री इंटरप्राइसेस चे आनंद देव, सुतार फर्निचर चे शुभम नवघरे, अम्बिशन फायनान्स कंसल्टंट अभिलाष राव आदी सदस्य उपस्थित होते.