

नागपूर : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे NCP नेते नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या गोटात (अजित पवार गटात) बसल्यावर विरोधकांनी यावरुन सत्ताधाऱ्यांना लक्ष केले. यावरुन खडाजंगी होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. “मलिक जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचे मंत्रिपद का काढण्यात आले नाही, याचे उत्तर विरोधकांनी आधी द्यावे आणि नंतर आम्हाला विचारावे” असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. (Nawab Malik)
विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे Ambadas Danve म्हणाले की, ज्यांच्यावर दाऊद इब्राहिमसोबत संबंध असल्याचे गंभीर आरोप केले, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले आहेत. दानवे यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटते. प्रत्यक्ष व्यक्ती जेलमध्ये असताना देखील, त्याला आम्ही मंत्रीपदावरून काढणार नाही अशी भूमिका ज्या नेत्यांनी घेतली ते आता येथे भूमिका मांडत आहेत. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजूला अजितदादा बसले आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका. पहिल्यांदा तुम्हाला हे उत्तर द्यावे लागेल, देशद्रोहाचा आरोप झाल्यावर देखील, आणि ते जेलमध्ये असताना सुद्धा तुम्ही त्यांना मंत्रिपदावरून का काढले नाही. याचे उत्तर आधी द्या त्यानंतर आम्हाला विचारा, असे फडणवीस म्हणाले.